बेळगाव

Belgaum news | मराठी फलकांसाठी २२ जूनला मोर्चा : समितीचा निर्धार

उद्या हुतात्म्यांना अभिवादन, २९ जून रोजी मुंबईत धरणे : ६० : ४० ची अंमलजावणी सरकारी फलकांवरही व्हावी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : कर्नाटक सरकारनेच फलकावरती ६० : ४० नियम बनवला आहे. त्यामुळे येत्या २२ जूनच्या आत सरकारी कार्यालयांसह परिवहन मंडळाच्या बसवर मराठी भाषेला स्थान द्यावे, अशा आशयाचे निवेदन मध्यवर्ती म. ए. समितीत ३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर तसे न झाल्यास २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल. तसेच २९ जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या घरासमोर धरणे आंदोलन धरण्याचा एकमुखी निर्णय शनिवारी म. ए. समितीच्या मराठा मंदिर येथे आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला.

१ जून रोजी हुताम्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी ८.३० वाजता कंग्राळी येथे हुतात्मा स्मारकाजवळ मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. ते म्हणाले, सरकारनेच ६०: ४० नियम बनवला आहे. त्याची सक्ती केवळ दुकानदार, व्यावसायिकांवर न करता सरकारी कार्यालये, रुग्णालये, परिवहन मंडळ, बसस्थानकावरही करावी. त्यासाठी ३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ. नियमाप्रमाणे तेथील फलकावरदेखील मराठी भाषेला स्थान मिळाले पाहिजे.

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत रविवारी (दि.३१) ओरिएंटल स्कूलमध्ये येणार आहेत. त्यांची सकाळी भेट घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा कार्यक्रम २९ जून रोजी निश्चित करूया, असेही ठरवण्यात आले.

खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई म्हणाले, आम्ही तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी होऊ. बैठकीला माजी आमदार मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, रणजित चव्हाण-पाटील, रामचंद्र मोदगेकर, एम. जी. पाटील, शिवाजी खांडेकर, रावजी पाटील, मल्लाप्पा गुरव, आर. के. पाटील, लक्ष्मण गुरव, बाळासाहेब फगरे, राजाराम देसाई, आबासाहेब दळवी, रणजित पाटील, गोपाळ पाटील, मोनाप्पा पाटील, आर. एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर, अनिल पाटील, विकास कलघटगी, मोनाप्पा संताजी यांच्यासह घटक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT