बेळगाव : निवडणूक आयोगाने राबवलेल्या एसआयआर प्रक्रियेचे अर्ज मराठीत देण्याची वारंवार मागणी करुनही टाळाटाळ करण्यात आली. पण, आता महाराष्ट्र एकिकरण समितीच्या मागणीला यश आले असून मराठी भाषिकेतील प्रारुप मतदार याद्या दाखल झाल्या आहेत. या याद्यांमुळे नावे गायब झालेल्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळाली आहे.
एसआयआर प्रक्रियेवेळी सीमाभागातील मराठी मतदारांना मराठीतून अर्ज देण्यात आले नाहीत. त्यामुळे याविरोधात मध्यवर्ती म. ए. समिती आणि म. ए. युवा समितीने केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली. निवडणूक आयोगाने याआधी बजावलेल्या आदेशाची प्रत दाखविली तरी त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सुरवातीला आपण याबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आणि ऐनवेळी अशा प्रकारे अर्ज देता येणार नाही. मराठी मतदारांसाठी मराठीत भाषांतरीत केलेला अर्ज दाखविण्यात येईल, असे सांगून हात वर केले होते. त्यामुळे मराठी भाषिकांचा हक्क डावलण्यात आला होता.
२३ सप्टेंबरपर्यंत आक्षेप
आता एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. ही मतदार यादी मराठीतूनही उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षांसह ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी प्रसिद्ध केल्या आहेत. जिल्ह्यात पाच लाख १३ हजार मतदारांची नावे गायब आहेत. त्यामुळे या यादीत नावे तपासून गायब झालेल्या नावांबाबत २३ सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहेत. नव्याने यादीत नाव दाखल करता येते. त्यामुळे मराठी मतदार यादीत नाव घालण्याची संधी आहे.
कागदपत्रेही मराठीतून मिळावीत
मराठीतून मतदार याद्या उपलब्ध करुन देण्यात आल्याने मराठी संघटनांच्या एका लढ्याला यश आले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची मोठी सोय झाली आहे. आता शासकीय कागदपत्रेही मराठीतून मिळावीत, अशी मराठी भाषिकांची मागणी आहे. मराठीतून कागदपत्रे देण्यासह फलकांवर मराठीला स्थान देण्याची मागणी जुनी आहे. याबाबत म. ए. समितीसह मराठी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी दिलेले आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद राेशन यांनी पाळलेले नाही. शिवाय समन्वय समितीचीही अद्याप स्थापना करण्यात आलेली नाही. आता त्या मागण्यांसाठी जोर लावण्याची गरज आहे.