बेळगाव

Belgaum News: सरकारी कार्यालयांवरही हवेत मराठी फलक

मनोहर किणेकर : १ जूनरोजी हुतात्म्यांना अभिवादन, १५ जूनपर्यंत डांबर मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : कन्नडसक्तीच्या विरोधातील आंदोलनात १ जून १९८६ रोजी सीमाभागाने हुतात्मे दिले. त्यांना १ जूनरोजी अभिवादन करण्यात येईल. तसेच सरकारी फलकांवरही कन्नडसह मराठीला स्थान द्यावे, या मागणीसाठी १५ जूनच्या आत डांबर मोर्चा काढण्यात येईल, असा निर्धार शनिवारी तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.

१ जून १९८६ साली मराठी भाषिकांवर सक्तीने कन्नड भाषा लादण्यात आली. या दडपशाहीच्या विरोधात सीमाभागातील मराठी भाषिकांनी तीव्र आंदोलन छेडले. दरवर्षी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळत आलो आहोत. यंदाही १ जूनरोजी सकाळी ८.३० वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ हजारोच्या संख्यने उपस्थित राहून हुताम्यांना अभिवादन करा, असे आवाहन माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले. शनिवारी मराठा मंदिरात आयोजित बैठकीत अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. बैठकीला व्यासपीठावर आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, एम. जी. पाटील, लक्ष्मण होनगेकर उपस्थित होते.

किणेकर पुढे म्हणाले, शहरात सगळीकडे कानडीकरणाचा वरवंटा फिरवण्यात येत आहे. कन्नड सक्तीच्या नावाखाली आस्थापनाच्या बोर्डवर कानडी भाषेला प्राधान्य देण्यात येत आहे. ६० टक्के कन्नड आणि ४० टक्के स्थानिक भाषेलाही प्राधान्य देण्याचा नियम सरकारनेच बनवला आहे. त्याची अंमलबजावणी सरकारी कार्यालयांवरदेखील करावी, यासाठी १५ जूनच्या दरम्यान डांबरमोर्चा काढण्याचे नियोजन आहे. त्याबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जागे करण्यासाठी २० ते २२ जूनच्या दरम्यान महाराष्ट्र मुख्यमंत्र्याच्या घरासमोर धरणे आंदोलन कार्यक्रम हाती घेणार आहे.

कार्याध्यक्ष आर. एम चौगुले म्हणाले, सीमाप्रश्न न्यायालयात आहे म्हणून रस्त्यावरची लढाई थांबवून चालणार नाही. १ जून हुताम्यांना अभिवादनानंतर गावोगावी मोर्चाबाबत जनजागृती व्हायला हवी. मोठ्या संख्येने सीमाबांधव मोर्चात सहभागी व्हायला हवेत. समितीच्या प्रवाहात युवावर्गाला कसे सामावून घ्यावे यावर विचारमंथन व्हायला हवे. लक्ष्मण होनगेकर म्हणाले, सीमालढ्यात आमचेच काही चुकते आहे का, असे आम्हाला वाटत आहे. तुम्हाला मराठी भाषा, सीमाप्रश्न पाहिजे की नको, अशा आशयाची मतपत्रिका घरोघरी फिरवून मते आजमावून घ्यावीत का?

बैठकीला रामचंद्र मोदगेकर, अनिल पाटील, सूर्याजी पाटील, रमेश देसूरकर, मल्लाप्पा गुरव, विठ्ठल पाटील, शिवाजी खांडेकर, मारुती पाटील, राजू किणयेकर, नारायण सावगावकर, मोहन बेनके, आर. के. पाटील, वसंत मन्नोळकर, डी. बी. पाटील, मोनाप्पा पाटील, आप्पासाहेब किर्तने, नारायण दळवी, बाळासाहेब फगरेंसह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT