बेळगाव ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी 21 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर शहरातील मराठीपण जपण्यासाठी, कानडी गुंडांच्या दादागिरीविरोधात मराठी फलकांसाठी भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक गुरुवारी (दि. 8) मराठा मंदिर कार्यालयात झाली. खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई अध्यक्षस्थानी होते. यावेळी 17 जानेवारी रोजी सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा ठराव करण्यात आला.
कर्नाटक सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. केरळमध्ये मल्याळम भाषेची सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी करत आहे. तर सीमाभागात कन्नडसक्तीचा वरवंटा फिरवत आहे. काही कानडी संघटनांचे कार्यकर्ते व्यापाऱ्यांवर दादागिरी करत आहेत. मराठी, इंग्रजी फलक काढत आहेत. या दादागिरीला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. 1972 मध्ये ज्याप्रकारे डांबर मोर्चा काढण्यात आला होता, त्याप्रकारे मराठी फलकांसाठी मोर्चा काढण्यात येईल. 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी झाल्यानंतर या मोर्चाचे आयोजन करण्यात येईल. त्याआधी जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाबाबत इशारा देण्यात येईल. मोर्चावेळी कोणतीही कारवाई झाली तरी माघार घ्यायची नाही, असे प्रकाश मरगाळे आणि सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी सांगितले.
आर. एम. चौगुले म्हणाले, कानडी गुंड शहरात मराठी आणि इंग्रजी फलकांविरोधात पोलिस संरक्षणात धुडगूस घालत आहेत. त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. हिंडलगा येथील हुतात्मा भवनाचे काम वेगाने सुरु करावे, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी लक्ष्मण होनगेकर, अनिल पाटील, रामचंद्र मोदगेकर, ॲड. एम. जी. पाटील, रणजीत चव्हाण-पाटील, राजू मरवे, मनोहर हुंदरे आदींनी मनोगत व्यक्त केले. बी. डी. मोहनगेकर, मोनाप्पा पाटील, बी. ओ. येतोजी, मल्लाप्पा गुरव, गोपाळ पाटील, रावजी पाटील, विकास कलघटगी, विलास बेळगावकर आदी उपस्थित होते.
दांडा मराठीच हवा
मराठी भाषेसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पक्षभेद बाजुला सारुन झेंडा कुठलाही असला तरी दांडा मराठीच हवा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. यावेळी सीमाप्रश्नी सुरु असलेल्या घडामोडींबाबतही माहिती देण्यात आली.
हुतात्म्यांना अभिवादन
17 जानेवारी रोजी बेळगाव शहरात सकाळी 8 वाजता आणि कंग्राळी खुर्द येथे सकाळी 9 वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.