Online Investment Scam 
बेळगाव

Belgaum Online Investment Scam : स्वतः गमावले ८० लाख; मित्राचे घालवले ८१ लाख

अथणीतील प्रकार : ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक, सीईनमध्ये तक्रार दाखल

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : ऑनलाईन गुंतवणुकीत स्वतःचे तब्बल ८० लाख रुपये गमावल्यानंतर एका ओळखीच्या व्यक्तीने त्याच फसव्या गुंतवणूक योजनेची शिफारस आपल्या मित्राला केली. त्याच्या सांगण्यावरुन मित्राने तब्बल ८० लाख ८६ हजार रुपये गुंतवले. मात्र, गुंतवलेली रक्कम किंवा अपेक्षित नफा परत न मिळाल्याने तोही सायबर फसवणुकीचा बळी ठरला. स्वतःची फसवणूक झालेली असताना एका व्यावसायिक मित्राला गुंतवणुकीस प्रवृत्त केल्याचा हा धक्कादायक प्रकार अथणीत नुकताच उघडकीस आला आहे.याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आली असून संशयितांचा शोध सुरु आहे.

तक्रारीनुसार, ५ जुलै रोजी तक्रारदाराच्या एका ओळखीच्या व्यक्तीने याच संपर्काद्वारे गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळाल्याचा दावा करुन त्याला एक मोबाईल क्रमांक दिला. त्यावर विश्वास ठेवून व्यावसायिकाने संबंधित व्हॉट्स ॲप क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्याला गुंतवणुकीची लिंक पाठवली. त्यावर क्लिक केल्यानंतर त्याला ‘लाँगटर्म वेल्थ क्लब’ या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. या ग्रुपमध्ये गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळत असल्याचे भासवणारे संदेश सातत्याने पाठविण्यात आले. ग्रुपमधील लोकांना अधिक पैसे गुंतवण्यासाठी सदस्यांना प्रोत्साहित केले जात होते. त्यानंतर त्याला ऑपस्टॉक्स वन-ऑन-वन व्हीआयपी सर्व्हिस आणि ऑपस्टॉक्स डीएमए एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस ग्रुप या आणखी दोन व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले.

यानंतर व्यावसायिक, त्याची पत्नी आणि भावाने अथणी, मुधोळ आणि हारुगेरीतील त्यांच्या बँक खात्यांमधून ५ ते २७ जुलै दरम्यान अनेक व्यवहार करत एकूण ८०.८६ लाख रुपये हस्तांतरित केले. मात्र, वारंवार पैसे गुंतवूनही परतावा मिळाला नाही तसेच गुंतवलेली मूळ रक्कमही परत करण्यात आली नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर संबंधित ओळखीच्या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्यानेही ऑनलाईन गुंतवणुकीत सुमारे ८० लाख रुपये गमावल्याचे सांगितले. त्यामुळे, स्वतः सायबर फसवणुकीचा बळी ठरलेल्या मित्राच्या सांगण्यावरुन दुसऱ्या मित्रानेही तब्बल ८१ लाख रुपये गमावल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला असून पैशांचे व्यवहार झालेली बँक खाती, मोबाईल क्रमांक, व्हॉट्स ॲप ग्रुप आणि रक्कम हस्तांतरणाचा तपास सायबर पोलिसांकडून सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT