बेळगाव : चार वर्षांपासून लग्नाच्या आमिषाने प्रेम करणार्या तरूणाने प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरूणीने लग्नाचा हट्ट सदर खून घडल्याची माहिती समोर आली आहे. रक्षिता सारिकर (वय २५, रा. हारुगेरी, ता. रायबाग) असे मृत तरुणीचे नाव असून या प्रकरणी अथणी तालुक्यातील अडळहट्टी येथील बसप्पा सिद्धाप्पा सातण्णावर याच्याविरोधात गोकाक शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बसाप्पा आणि रक्षिता यांच्यात गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. बसप्पाने रक्षिताशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तो वारंवार लग्न पुढे ढकलत असल्याने रक्षिता त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा करत होती. दरम्यान, शनिवार दि. २८ रोजी बसाप्पा रक्षिताला हारुगेरी येथून गोकाक धबधब्यावर घेऊन गेला होता. दुपारी चारच्या सुमारास धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या बंधाऱ्यावर दोघे बसून चर्चा करत होते. यावेळी रक्षिताने चार वर्षांपासून लग्नाचे आश्वासन देऊनही प्रत्यक्ष लग्न का करत नाहीस, असा जाब बसप्पाला विचारला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या बसप्पाने रक्षितालला मारहाण केली. त्यानंतर हाताने गळा दाबून तसेच दोरीच्या साहाय्याने गळा आवळून तिचा खून केल्याची फिर्याद रक्षिताच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बसाप्पाने रक्षिताचा मृतदेह फॉल्स टेकडीच्या उतारावरील काटेरी झुडपांमध्ये फेकून दिल्याचे फिर्यादीत नोंद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गोकाक शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.