Murder Case Pudhari
बेळगाव

Belgaum Murder Case: भोसकला चाकू, भासवला अपघात

दोन मित्रांमध्ये हाणामारी, एकाकडून दुसऱ्याचा खून

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव: पार्टीमध्ये चिकनचा तुकडा कमी पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या छातीत चाकू खुपसून त्याचा खून केला. त्यानंतर प्रकरण लपवण्यासाठी मित्र इमारतीवरून पडल्याचा बनाव केला. मात्र मृतदेहाच्या शल्यचिकित्सेतून खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.

सिताराम उर्फ सतीराम चंद्रदेव (रा. कबीरगंज, जिल्हा पिलीभीत, उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या खून प्रकरणी संशयित अरुण कुमार चौहान याला अटक करण्यात आली आहे. मुडलगी तालुक्यातील हुनशाळ पी.जी. गावात ही घटना घडली. घटनेनंतर चार दिवसांनी संशयिताला अटक झाली.

सीताराम आणि अरुण कुमार हे दोघेही हुनशाळ पी.जी. येथील खासगी कंपनीत काम करत होते. गेल्या रविवारी दोघांसह अन्य मित्रांनी एकत्र पार्टी केली होती. पार्टीदरम्यान चिकन कमी पडल्याने आणखी चिकन आणायचे की नाही, यावरून सीताराम आणि अरुण यांच्यात बाचाबाची झाली. काही वेळातच हाणामारी होऊन अरुणने सीतारामच्या छातीवर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या सीतारामला तत्काळ उपचारासाठी गोकाक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर संशयिताने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. सीताराम इमारतीवरून पडल्याने जखमी झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शवविच्छेदन अहवालानांतर संशय निर्माण झाल्यानंतर घटप्रभा पोलिसांनी रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. तसेच अरुणला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर चिकन खाण्यावरून झालेल्या वादातून चाकूने हल्ला केल्याची कबुली त्याने दिली.

घटप्रभा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. घटप्रभा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT