संबरगी : शासनाच्या संगणकीय नोंदीतील गंभीर त्रुटीमुळे संबरगी येथील एका युवकाला जिवंत असूनही 'मृत' दाखविण्यात आल्याने गेली 3 वर्षे त्याला शासकीय रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकारामुळे संबंधित कुटुंबाला शासनाच्या विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असून दोषींवर कारवाई करून तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
संबरगी येथील भाऊसाहेब कांबळे यांचा मुलगा किशोर कांबळे हा प्रत्यक्षात जिवंत असून त्याचे नाव शिधापत्रिकेमध्ये आहे. पण शासकीय संगणकीय नोंदीमध्ये त्याची नोंद 'मृत' अशी झाल्यामुळे सन २०२३ पासून त्याचे रेशन धान्य बंद झाले आहे. भाऊसाहेब कांबळे यांनी ग्रामपातळीपासून तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरावरील संबंधित कार्यालयांकडे अनेकवेळा पाठपुरावा केला पण दुरुस्ती झालेली नाही.
उपतहसीलदारांकडून किशोर कांबळे जिवंत असल्याचा दाखलाही देण्यात आला आहे. तरीही संगणकीय नोंद दुरुस्त न झाल्याने रेशन धान्य सुरू झालेले नाही. याबाबत भाऊसाहेब कांबळे म्हणाले, गेली 3 वर्षे रेशन धान्य सुरू करण्यासाठी मी हेलपाटे मारत आहे. आहार अधिकारी प्रताप रायकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सदर घटना माझ्या नियुक्तीपूर्वीची आहे. पाठपुरावा करून रेशन लवकर सुरू करण्यात येईल.