बेळगाव : आम्ही दहा वर्षे एकत्रित असून, मी तिच्याशी लग्न केले आहे. त्यामुळे ती माझी बायको आहे. परंतु, तिच्या माहेरचे लोक तिचे जबरदस्तीने दुसरे लग्न करत आहेत, असा दावा एका विवाहित पुरुषाने केला आहे. तर महिलेचे व तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे की, त्याने फसवून लिव्ह इन रिलेशनशिप वाढवली. त्यामुळे आता तिलाच त्याच्यासोबत राहायचे नसून तिला लग्न करायचे आहे. परंतु, हा पार्टनर आडकाठी घालत आहे. यातून सोमवारी सकाळी मुलीच्या घरासमोर जबरदस्त वाद झाला. या प्रकरणी परस्परांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, त्या महिलेचे लग्न बुधवारी, १३ मे रोजीच आहे.
विश्वेश्वर (नाव बदलले आहे) नामक विवाहित पुरुषाचा दावा आहे की, बेळगाव तालुक्यातीलच एका गावातील रागिणी (नाव बदलले आहे) या युवतीसोबत आपण दहा वर्षे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहात आहे. तिला एका मंदिरात नेऊन मंगळसूत्र बांधले आहे. परंतु, आता तिच्या घरचे आपल्याला अंधारात ठेवून तिचे लग्न भलत्याच व्यक्तीसोबत करत आहेत. हे लग्न बुधवारी नियोजित आहे.
याच कारणातून विश्र्वेश्र्वरने सोमवारी सकाळी त्या महिलेच्या घरासमोर जाऊन धिंगाणा घातला. यावेळी या महिलेच्या घरच्यांनी आपल्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. शिवाय चाकूने भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला, असेही विश्र्वेश्र्वरचे म्हणणे असून, तशी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या घरच्या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर विश्वेश्वर यानेही मुलीचे वडील व भावाविरोधात फिर्याद दिली आहे. तो मागासवर्गीय असल्याने ॲट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
बलात्काराचा गुन्हा
विश्वेश्वर याच्यावर वर्षापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सदर महिलेच्या भावाने व महिलेने तशी फिर्याद पोलिसांत दिल्यानंतर विश्र्वेश्र्वरला अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली होती. परंतु, प्रकरण न्यायालयात गेल्याने सदर महिलेने विश्र्वेश्र्वरच्या बाजूने साक्ष नोंदवल्याने तो निर्दोष सुटला होता. तेव्हापासून ती आपल्या बाजूने असल्याचा अति आत्मविश्वास आल्यानेच त्याने घरासमोर जाऊन धिंगाणा घातल्याचे पोलिसांनी सांगितले.