बेळगाव : बँक ऑफ इंडियाच्या कार्ड विभागातील अधिकारी असल्याचे भासवून अज्ञात भामट्यांनी निवृत्त व्यक्तीची तब्बल ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर क्राईम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण मारुती पवार (रा. आदर्शनगर, हिंदवाडी, बेळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०.४५ च्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला. संबंधिताने आपण बँक ऑफ इंडियाच्या कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर व्हॉट्स अॅपवर एक लिंक पाठवून ती उघडण्यास सांगितले. फिर्यादी पवार यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक ऑफ इंडिया खात्यातून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम वजा झाली.
एकूण सुमारे ७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून खाते गोठविण्याची विनंती केली तसेच सायबर क्राईम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.