बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य, येळ्ळूर’ फलक हटविण्यास शांततापूर्ण रितीने विरोध करणाऱ्या मराठी भाषिकांवरच लाठीहल्ला करून उलट त्यांच्यावरच गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस प्रशासनाला पुन्हा दणका बसला आहे. न्यायालयाने बुधवारी येळ्ळूरच्या 10 मराठी कार्यकर्त्यांची खोट्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. पैकी एका कार्यकर्त्याचे निधन झाले आहे.
बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कुमार परशराम मासेकर, मनोज लक्ष्मण नायकोजी, केदारी राघोजी पाटील, नंदू गोपाळ कुगजी, राहुल अर्जुन अष्टेकर, नामदेव विठ्ठल कदम, राजू जोतिबा नायकोजी, सुधीर परशुराम धामणेकर, जयसिंग यल्लाप्पा कुगजी आणि प्रकाश नारायण कुगजी यांची निर्दोष मुक्तता केली. यापैकी मनोज लक्ष्मण नायकोजी यांचे निधन झाले आहे. 2014 च्या जुलै महिन्यात प्रशासनाने प्रचंड पोलिस बंदोबस्तात येळ्ळूरचा मानबिंदू असलेला महाराष्ट्र राज्य हा फलक हटविला. त्यानंतर स्वाभिमानी मराठी लोकांनी त्याठिकाणीच पुन्हा फलक उभारला; पण दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी पुन्हा तो हटविला. या कारवाईला गावातील सर्व लोकांनी शांततापूर्ण वातावरणात विरोध केला; पण पोलिसांनी बळाचा वापर केला.
पोलिसांनी गावात शिरून लोकांना अमानुष मारहाण केली. लहान मुले, तरुण, वृद्ध आणि महिलांवरही लाठीहल्ला केला. घरांचे दरवाजे तोडण्यात आले. जनावरांनाही मारहाण केली. यामध्ये शेकडो लोक जायबंदी झाले. एवढ्यावरच न थांबला पोलिसांनी गावातील लोकांवरच गुन्हे दाखल केले. पोलिसांनी एकूण सात गुन्हे दाखल केले होते. पैकी चार खटले आधीच निकालात काढण्यात आले असून, सर्व मराठी कार्यकर्ते निर्दोष सुटले आहेत. मराठी कार्यकर्त्यांच्या वतीने ॲड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. शाम पाटील, ॲड. हेमराज बेंचण्णावर यांनी काम पाहिले. सातपैकी पाच खटल्यांचा निकाल लागला आहे. आता दोन खटले शिल्लक राहिले आहेत. तब्बल बारा वर्षांनंतर खटल्याचा निकाल लागला आहे.