Online Fraud Pudhari News Network
बेळगाव

Belgaum Online Fraud : कर्ज घेऊन गुंतवणुकीचा फंडा, ७२ लाखांचा गंडा!

जादा परताव्याव्या मोहाने कर्ज काढून गुंतवली रक्कम, ऑनलाईन आमिषाला बळी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : जादा परतावा मिळवण्याच्या मोहातून कर्ज काढून सुमारे ७२ लाख रुपये गुंतवलेल्या युवकाची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. फसलेल्या युवकाने जिल्हा सीईएनमध्ये फिर्याद दिली असून भामट्यांचा शोध सुरू आहे.

अधिक माहिती अशी : आधी बंगळूर येथील खासगी कंपनीत कार्यरत असलेला कर्मचारी आता आपल्या गावी गोकाक येथे राहात आहे. त्यांचे बंगळूर येथील एचडीएफसी बँकेत खाते आहे. या खात्याला त्यांचा मोबाईल क्रमांक लिंक असून यावरून ते ऑनलाईन व्यवहारही करतात. २० जूनरोजी त्यांच्या व्हॉट्स ॲपवर एका अनोळखी क्रमांकावरून लिंक आली. त्यांनी ती लिंक डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु, झाली नाही. यानंतर २१ ऑगस्टरोजी त्याच क्रमांकावरून पुन्हा एक लिंक आली.

या लिंकवर क्लीक करताच ते ई-१३३ डेडीकेटेड कस्टमर सर्व्हिस नावच्या एका ग्रुपशी ते जोडले गेले. यानंतर त्यांना जादा परताव्याचे आमिष दाखवले गेले. शिवाय त्यांच्या बँक खात्यावर नफा दाखवत त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. नंतर २६ ते २८ ऑगस्ट या दरम्यान भामट्यांनी त्यांच्या खात्यावरून तब्बल ७१ लाख ८० हजार रुपये विविध बँक खात्यावर वर्ग करून घेतले. यानंतर नफा अन्‌ गुंतवलेली रक्कम परत न देता मोबाईल क्रमांक बंद करून टाकला आहे.

आधी डिलीट, पुन्हा जोडले

भामट्यांनी फसवणुकीचा वेगळाच फंडा वापरल्याचे दिसून आले आहे. आधी त्यांनी ३० जून रोजी संबंधित कर्मचाऱ्याला लिंक पाठवली. त्यावरून रक्कम गुंतवण्यास सांगितली. त्यानंतर त्यांच्या खात्यावर नफा जमा झाल्याचे दाखवत अचानक लिंक डिलिट करून टाकली. नफा मिळाला, पण पुढे गुंतवणूक करता येईना, अशी अवस्था झाल्याने सदर कर्मचारी अस्वस्थ बनला. यानंतर या भामट्यांनी पुन्हा तब्बल महिन्यानंतर याच क्रमांकावरून लिंक पाठवत रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. आधी नफा मिळालेला असल्याने फिर्याददाराने डोळे झाकून भामटे सांगतील त्या खात्यावर रक्कम वर्ग केली. मात्र मोठी रक्कम जमा होताच भामट्यांनी पुन्हा संपर्क बंद केला.

कर्ज घेऊन रक्कम गुंतवली

फिर्याददाराने पोलिसांना सांगितले की, आधी पाठवलेल्या लिंकवर नफा दाखवत लिंक डिलीट केली. त्यानंतर पुन्हा महिन्याने लिंक पाठवत आपला विश्वास संपादन केला. ही कंपनी आपला फायदा करेल असे वाटल्याने आपण अनेकांकडून कर्जाऊ रक्कम या कंपनीत गुंतवली आहे. कर्ज घेतल्याने अडचणीत आलो असून, आपली रक्कम परत मिळवून देण्याची विनंती त्यांनी सीईएन पोलिसांना केली आहे.

आमिषाला बळी पडू नका

अनोळखी लिंक, एपीके फाईलवर क्लिक करू नका. भामटे आधी तुम्हाला गोड बोलून विश्वास देतात की तुम्हाला वाटते आपला इथे फायदा होणार आहे. त्यामुळे आपण ही बाब आपल्या जवळच्या व्यक्तीलाही न सांगता रक्कम गुंतवत जातो व फसल्यानंतर फसलो गेल्याचे लक्षा येते. त्यामुळे जादा परतावा, अधिक नफा याला बळी पडू नका, असे आवाहन सीईएन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT