बेळगाव : मालमत्तेच्या वादातून सवसुद्दीतील (ता. रायबाग) वकिलाचे अपहरण करुन खून करण्यात आला. तर गोकाकमध्ये एका वकिलाला मारहाण करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वकिलांवरील हल्ले रोखावेत व दोन्ही प्रकरणांतील संशयितांना अटक करुन कठोर कारवाई करावी या मागणीसाठी वकिलांनी गुरुवारी (दि. 19) काम बंद आंदोलन करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
सवसुद्दीतील संतोष अशोक पाटील या वकिलाचे दीड महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आले. त्यानंतर रामनगरमध्ये (ता. जोयडा) त्यांचा खून करुन पुरावा नष्ट करण्यात आला. त्यात चार वकिलांसह आठजणांचा समावेश आहे. याप्रकरणी त्याचे कुटुंबीय फिर्याद दाखल करण्यासाठी रायबाग पोलिस ठाण्यात गेले असता फिर्याद घेण्यात आली. त्यानंतर जिल्हा पोलिसप्रमुखांकडे धाव घेण्यात आली. मात्र, या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे, कुटुंबियांनी अॅड. एस. एस. पाटील यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी हालचाली करत तपास सुरु केला. अर्धवट जळालेल्या त्या मृतदेहाची हाडे न्यायालयात सादर केली. डीएनए चाचणीत मृतदेह वकिलाचाच असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी चौघांना अटक केली. मात्र, प्रकरणातील संशयित वकिलांनीही अटक करावी. तसेच तपासाला टाळाटाळ करणार्या पोलिसांवरही कारवाई करावी.
गोकाकमध्ये अॅड. सी. बी. गिड्डण्णावर यांना मारहाण करण्यात आली आहे. त्यांना मारहाण करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या अनुपस्थितीत निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदनाचा स्वीकार केला.
यावेळी अॅड. आर. पी. पाटील, अॅड. आर. सी. पाटील, अॅड. अमर येळ्ळूरकर, अॅड. गजानन पाटील, अॅड. सचिन शिवण्णावर, अॅड. दीपक काकतीकर, अॅड. अभय लगाडे, अॅड. श्रीधर मुतकेकर, अॅड. सुमित अगसगी, अॅड. नामदेव मोरे, अॅड. शिवाजी शिंदे, अॅड. मारुती कामाण्णाचे यांच्यासह वकील उपस्थित होते.
तत्पूर्वी सर्व वकिलांनी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर यांच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा चौकात रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.