कामगार नेते कॉ. कृष्णा मेणसे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. Pudhari Photo
बेळगाव

बेळगाव: ज्येष्ठ कामगार नेते, समाजवादी विचारवंत कॉ. कृष्णा मेणसे यांचे निधन

Krishna Mense | Belgaum News | सरस्वती नगर येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : बेळगाव येथील ज्यष्ठ कामगार नेते, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक व सीमालढ्यातील बिनीचे नेते कॉ. कृष्णा मेणसे (Krishna Mense) यांचे सोमवारी (दि. 13) दुपारी 3 वाजता वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, सीमालढा अशा विविध चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. समाजातील कष्टकरी, शेतकरी, कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी रस्त्यावरचा सातत्याने लढा दिला.

कॉ. कृष्णा मेणसे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, प्राचार्य आनंद मेणसे, लेखक संजय मेणसे हे मुलगे व कन्या लता पावशे, श्रीमती नीता पाटील व नातवंडे असा परिवार आहे.

सोमवारी रात्री आठ वाजता सरस्वती नगर येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सच्चा कम्युनिस्टवादी, कडवा सीमासत्याग्रही, उत्कृष्ट वाकपटू, लेखक, संपादक, अशा विविध भूमिकेतून त्यांची कारकीर्द बेळगाव परिसरात सतत गाजत राहिली. बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. आपल्या विचारांची प्रामाणिक असणारा नेता अशी त्यांची ओळख होती. सीमाभागात ‘आप्पा’ या आदरार्थी नावाने परिचित असणारे कॉ. कृष्णा मेणसे सीमालढ्याचा चालता बोलता इतिहास होता. अंधश्रद्धा निर्मूलन, भ्रष्टाचार निर्मूलन आणि सीमालढा यात त्यांची भरीव कामगिरी कायम स्मरणात राहील अशीच आहे.

सीमाप्रश्नाच्या चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे. 1956 साली 1 वर्षे कारावास भोगला. आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मराठीत मांडली. त्यांना अलीकडेच 'राष्ट्रवीर' कार शामराव देसाई, गडहिंग्लज येथील गांधी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते सक्रिय होते. चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना त्यांनी पत्रकारिताही केली. हेमंत नावाचे मासिक आणि नंतर साम्यवादी नावाने साप्ताहिक सुरु करून आपल्या लेखणीतून कष्टकरी श्रमिकांचे प्रश्न मांडले. त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी हो ची मिन्ह यांचे चरित्र, बसवेश्वर ते ज्ञानेश्वर, अशा तोडल्या बेड्या, असा लढलो, असा घडलो, गोठलेली धरती पेटलेली मने, गोवा मुक्ती आंदोलन, डॉ. आंबेडकर आणि बुद्धधर्म याबरोबर वीरगाथा या कन्नड पुस्तकाचा अनुवाद, परिक्रमा प्रवासवर्णन, वीरराणी कित्तूर चन्नमा असे विपुल लेखन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT