बेळगाव

Belgaum News : गर्भाशयातील १.६४ किलोची गाठ काढण्यात यश

केएलई सेंटेनरी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : येळ्ळूर रोडवरील केएलई सेंटेनरी चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये एका जटिल शस्त्रक्रियेद्वारे ४१ वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून सुमारे १.६४ किलो वजनाची एक मोठी गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली.

या महिलेच्या पोटात एक मोठी गाठ वाढत असल्यामुळे त्या महिलेला बऱ्याच काळापासून तीव्र वेदना व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. वैद्यकीय पथकाने आवश्यक चाचण्या करुन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्या महिला रुग्णाने संयम राखत उत्तम सहकार्य दाखवले. गर्भाशयात वाढणाऱ्या अशा गाठींना वैद्यकीय भाषेत फायब्रॉइड्स म्हणतात. या गाठी मोठ्या झाल्यानंतर पोटदुखी, मासिक पाळीत अतिरक्तस्राव व पोटात जडपणा जाणवणे यांसारख्या विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. गाठीचा आकार, रुग्णाची लक्षणे व एकूण आरोग्य स्थिती लक्षात घेऊन योग्य उपचार ठरवले जातात.

गाठ खूप मोठी असल्याने वैद्यकीय पथकाने हिस्टरेक्टॉमी शस्त्रक्रिया केली. या प्रक्रियेमध्ये पोटावर छेद घेऊन शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय काढले जाते. अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी वैद्यकीय कौशल्य, सावधगिरी व अचूक शस्त्रक्रिया व्यवस्थापन आवश्यक असते. ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया डॉ. गीतांजली व डॉ. होलिकट्टी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

भूलतज्ज्ञांच्या टीमने शस्त्रक्रियेदरम्यान आवश्यक भूल देण्याची सेवा पुरवली. व शस्त्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत केली. यूएसएम-केएलईचे संचालक डॉ. एच. बी. राजशेखर, मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन एन. व वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय कंबार यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, भूलतज्ज्ञ व ओटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT