Belgaum News: जळाला मोहोर, शेतकऱ्यांच्या जिवाला घोर Pudhari
बेळगाव

Belgaum News: जळाला मोहोर, शेतकऱ्यांच्या जिवाला घोर

काजू उत्पादन निम्याहून अधिकने घटणार : बेळगाव-खानापूर तालुक्यांतील शेतकरी अडचणीत

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : धुके, अवकाळी उष्णता आणि वातावरणातील बदलामुळे बेळगाव, खानापूर तालुक्यात काजूच्या झाडांना आलेला मोहोर जळाला आहे. यामुळे काजू उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असताना मोहोर जळाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. निम्याहून अधिक उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील बेळगाव, खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर काजूच्या बागा आहेत. यंदा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात काजूच्या झाडांना चांगला मोहोर आला होता. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र मध्यंतरी पसरलेले धुके, बदललेले हवामान आणि पावसाचा अभाव यामुळे मोहोर सुकून जळाला आहे. परिणामी काजूची फळधारणा कमी प्रमाणात झाली आहे.

शेतकऱ्यांच्या मते, मोहोर जळाल्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. अपेक्षित उत्पादन न मिळाल्यास आर्थिक अडचणी निर्माण होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात काजू उत्पन्नावर अवलंबून असते. उत्पन्नात घट झाल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडणार आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, धुके, तापमानात अचानक वाढ, कोरडे हवामान आणि पाण्याची कमतरता यामुळे काजूचा मोहोर जळण्याची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी बागायतीत आवश्यक ती काळजी घेणे तसेच कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाने पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

उत्पादन घटणार

बेळगाव, खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात काजूला पोषक वातावरण आहे. त्यामुळे काजूच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. यातून शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळत आहे. बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी, राकसकोप, सोनोली, बिजगर्णी, बेळवट्टी, बाकमूर, कुद्रेमानी, यळेबैल, किणये, नावगे, कावळेवाडी, बडस, बोकमूर, खादरवाडी, वाघवडे, रणकुंडये, संतिबस्तवाड, उचगाव, बेकीनकेरे, कोनेवाडी, तुरमुरी, अतिवाड, गोजगे, आंबेवाडी, कडोली, जाफरवाडी, देसूर, बेनकनह्ळळ्ी, सावगाव, मंडोळी, झाडशहापूर परिसरात काजूच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. धुक्यामुळे काजूचा मोहोर जळाला आहे. यामुळे निम्यापेक्षा अधिक उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फळधारणा उशिरा

यंदा काजू फळधारणा उशिरा झाली आहे. काही भागात काजू पिकण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, प्रमाण अत्यल्प आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या प्रारंभापासून काजू फळधारणेला वेग येत असे. परंतु, सध्या फळधारणा सुरू झाली आहे. हवेतील बदलाचा फटका बसला आहे. फेब्रुवारी महिन्यात धुके पडले होते. याचा फटका काजू मोहोराला बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT