बेळगाव : स्मार्ट सिटीचा डंका पिटणाऱ्या प्रशासनाचे पितळ पहिल्याच पावसात उघड झाले आहे. खडे बाजार नावाने प्रसिद्ध असलेला बाजार आता खड्डे बाजार बनला असून, स्मार्ट सिटी योजनेतून बनलेल्या तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलावरही खळगे पडले आहेत. गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, राकसकोप रोड, गांधी नगर, टिळकवाडी, उद्यमबाग, कँप अशा शहराच्या चहूबाजूंनी आणि मध्यभागीही खड्डेच खड्डे पडले आहेत.
बाजारपेठेचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या समादेवी मंदिरासमोरच मोठा खड्डा पडला आहे. संयुक्त महाराष्ट्र चौकातही खड्डे असून, तिथून गणपत गल्लीकडे जातानाही खड्ड्यांतूनच वाट काढावी लागते. गणपत गल्ली, काकतीवेस गल्ली, कडोलकर गल्लीतही फक्त खड्डेच दिसतात. भेंडी बाजार, फोर्ट रोडही खराब झाले आहेत. न्यू गुड्स शेड रोडचीही दूरवस्था झाली असून, डेक्कन हॉस्पिटलसमोर रस्त्याची चाळण झाली आहे.
कॅम्प ट्रॅफिक पोलिस स्टेशनसमोरील जसरोटीया रोडची चाळण झाली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गणेशपूर-राकसकोपकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यातही मोठे खड्डे पडले आहेत. याबाबत कॅण्टोन्मेंट अधिकाऱ्यांना नागरिकांनी निवेदन दिले होते. त्यावर काही दिवसांपूर्वी खड्ड्यात मातीचा भराव घातला होता. मात्र पावसात पाणी साचून खड्डे पडले आहेत.
कामेही जुलैमध्येच!
गणपत गल्ली- कडोलकर गल्लीच्या कोपऱ्यावर मोहरीचे काम सुरू आहे. काँक्रीटीकरण काम शिल्लक आहे. त्यामुळे रस्ता बंद असल्याने बुरूड गल्ली, मारूती गल्लीतून गर्दी वाढली आहे. खडे बाजार मुख्य रस्त्यावरच एल ॲण्ड टी कंपनीतर्फे पिण्याच्या पाण्याचे पाईप लाईन खोदाई करून पाईप घातली जात आहे. सरदार्स मैदानाशेजारून जाणऱ्या रस्त्यावरही मोरी बांधण्याचे काम आताच हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हाही रस्ता बंद आहे.
अपघात
रस्त्यातील खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी लहान अपघात होत आहेत. महापालिका, कँटोन्मेंटने समस्येची दखल घेऊन पाऊस कमी झाल्यानंतर रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहन धारकांतून होत आहे.