कारदगा : हुपरी-कुरुंदवाड हा आंतरराज्य रस्ता असून बोरगावपासून कसनाळ, जंगमवाडी या कर्नाटक हद्दीपर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून प्रवाशांतून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. सदर रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
रस्ता डांबरीकरणासाठी स्थानिक नेत्यांनी श्रेयवाद घेण्यास सुरुवात केली आहे. रस्त्याच्या श्रेयवादापेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करुन रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे. रस्त्याचे काम त्वरित सुरू न झाल्यास कसनाळ येथील उज्ज्वल भविष्य युवा मंचतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असते. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते आम्ही निधी मंजूर करून आणला असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे श्रेयवादापेक्षा रस्ता डांबरीकरण होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. यावेळी जीवन कांबळे, राकेश निंबाळकर, सतीश कांबळे व नागरिक उपस्थित होते.