बेळगाव

Karnataka Politics: मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा ब्रेक

मल्लिकार्जुन खर्गे बंगळूरला परतल्याने बैठक अर्धवट : राहुल गांधी यांच्याबरोबर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : राज्याच्या राजकारणात प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा एकदा विलंब होणार आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद हे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. परंतु एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तातडीने बंगळूरला आले. त्यामुळे राहुल गांधी यांनी खर्गे यांच्या उपस्थितीत याबाबत निर्णय घेऊ असे सूचविले आहे. यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा ब्रेक लागला आहे.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद हे बुधवारी (दि.१५) रात्री दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी रणजितसिंग सुरजेवाला, के. सी. वेणुगोपाल आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली. मात्र, एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे तातडीने दिल्लीहून बंगळूरला परतले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील बैठक दोन-तीन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी ही माहिती दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्राथमिक चर्चा करण्यात आली. त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे आल्यानंतर सविस्तर चर्चा करू, असे नेत्यांना सांगितले आहे. गरज पडल्यास त्यांना परत बोलावण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले असल्याचे समजते. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला असून, इच्छुक उमेदवार नाराज झाले आहेत.

दरम्यान, राज्याचे प्रभारी रणजितसिंग सुरजेवाला यांच्या निवासस्थानी सकाळी मुख्यमंत्री शिवकुमार, सिद्धरामय्या, बी. के. हरिप्रसाद यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळ नियुक्त्या, विधान परिषद सदस्यांची नियुक्ती याबाबत चर्चा करण्यात आली.

डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे घेऊन दीड महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. ६ ऑगस्टपासून राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. तत्पूर्वी, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री शिवकुमार यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यांनी संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला नेली होती. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्यानुसार दि. २२ किंवा दि.२५ रोजी नवीन मंत्र्यांचा शपथविधी करण्याचे नियोजन त्यांनी केले होते. परंतु, अचानक खर्गे यांना दिल्लीहून बंगळूरला यावे लागल्याने मंत्रिमंडळ विस्तार चर्चा करण्याची बैठक अर्धवट झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT