बेळगाव : राज्यातील विविध सरकारी विभाग, मंडळे आणि महामंडळांमधील प्रथमश्रेणी सहायक, द्वितीयश्रेणी सहायक यांसह विविध गट-क संवर्गातील ५ हजार ४३१ रिक्तपदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून, २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
भरतीसाठी ३० ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. बारावी (पीयूसी) उत्तीर्ण तसेच पदवीधर उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहेत.
या भरतीमध्ये प्रथमश्रेणी सहायक, द्वितीय श्रेणी सहायक, अकाऊंटस् असिस्टंट, ज्युनिअर अकाऊंटस् असिस्टंट, ग्रामपंचायत सचिव, ग्रामीण विकास सहायक, वॉर्डन, वसतिगृह अधीक्षक, ज्युनिअर असिस्टंट, वाणिज्य कर निरीक्षक, सब-रजिस्ट्रार आणि सहकारी संस्थांचे लेखापरीक्षक आदी पदांचा समावेश आहे. केईएमार्फत उर्वरित मूळ संवर्ग (आरपीसी) आणि कल्याण कर्नाटक संवर्गांतर्गत चार स्वतंत्र अधिसूचनांद्वारे ही भरती केली जाणार आहे.