Electricity Outage 
बेळगाव

Belgaum News: कर्ले परिसर शनिवारपासून अंधारात

झाडे, फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित

पुढारी वृत्तसेवा

किणये : तालुक्याच्या पश्चिम भागातील कर्ले, बहाद्दरवाडी आणि जानेवाडी गावांमध्ये शनिवारी (दि. ४) रात्री आठपासून वीज गायब झाली आहे. जोरदार पावसामुळे काही जुनाट झाडे वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुरवठा बंद झाला. रविवारी सायंकाळपर्यंत सुमारे २२ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसरातील लोकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

वीज नसल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. घरगुती कामे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, मोबाईल चार्जिंग, इंटरनेट सेवा तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास यावर परिणाम झाला आहे. अनेक शेतकरीही वीजेअभावी शेतीसाठी आवश्यक असलेले पंप सुरू करू शकत नसल्याने अडचणीत सापडले आहेत. गेल्या २२ तासांपासून वीज नसल्यामुळे गावातील लहान व्यावसायिक, किराणा दुकानदार, दूध व्यवसाय करणारे तसेच इतर व्यापाऱ्यांचेही नुकसान होत आहे. विजेवर चालणारी उपकरणे बंद असल्याने अनेक कामे रखडली आहेत. रात्रीच्या वेळी अंधारामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

ग्रामस्थांनी हेस्कॉमशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वीजपुरवठा कधी सुरु होणार याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याची तक्रार लोकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्या वाढत असल्याची तक्रार आहे. पावसाळ्यात किरकोळ बिघाड झाला तरी वीजपुरवठा दीर्घकाळ बंद राहतो. त्यामुळे, हेस्कॉमने कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. कर्ले, बहाद्दरवाडी आणि जानेवाडी येथील लोकांनी वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या समस्या वारंवार उद्भवू नयेत यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत करण्याचीही अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT