बेळगाव : महाशिवरात्रीनिमित्त शहर परिसरातील शिवालये भाविकांच्या गर्दीने गजबजली होती. दिवसभर अभिषेक, विशेष पूजा, आरती, भजन, पालखी सोहळा आदी धार्मिक कार्यक्रमांची लगबग होती. दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आवारात 'हर हर महादेव'च्या गजरात भाविकांनी शिवदर्शनाचा लाभ घेतला.
कपिलेश्वर महादेव ट्रस्टतर्फे कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी (दि. २५) रात्री १२.३० वाजता जनकल्याणासाठी पहिला अभिषेक करण्यात आला. यानंतर विशेष रुद्राभिषेक झाला. बुधवारी (दि.२६) पहाटे ४.३० पर्यंत पंचामृत अभिषेक सुरू होता. महाशिवरात्रीदिनी दुपारी त्रिकालपूजा करण्यात आली. सायंकाळी पालखी प्रदक्षिणा व महाआरती भक्तिमय वातावरणात झाली. गुरुवारी (दि. २७) दुपारी १२ ते ४ या दरम्यान तिसावा महाप्रसाद वितरण होणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लाडू प्रसादाचे मोफत वाटप करण्यात आले. संपूर्ण मंदिर विद्युत रोषणाईने व फुलांनी सजवण्यात आले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त मंदिरासमोर कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या पुढे लांबलचक रांगा लागल्या होत्या. कडक उन्हातही भाविक तासनतास रांगेत थांबून होते. न्यू गुड्स शेड रोड येथे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग करण्यात आले होते. नेटक्या नियोजनामुळे भाविकांना व्यवस्थित देवदर्शनाचा लाभ घेता आला.