बेळगाव

Belgaum IT Park: कणबर्गीत १,२२३ कोटींचा आयटी पार्क

२४ एकरांत विस्तार, बुडा बैठकीत शिक्कामोर्तब; पहिल्या टप्प्याला लवकरच प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : देसूरमध्ये आय पार्क उभारण्याचे स्वप्न अधुरे राहिल्यानंतर आता शहरापासून जवळ कणबर्गीतीली स्कीम क्रमांक ६१ मध्ये आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. तीन टप्प्यांमध्ये या आयटी पार्कसाठी १,२२३ कोटींचा खर्च अपेक्षित असून २४ एकरांत हा प्रकल्प विस्तारलेला असेल. पहिल्या टप्प्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. त्याचबरोबर बेळगाव शहरात महिलांसाठी तीन स्वतंत्र व्यायामशाळा उभारण्याचाही निर्णय झाला.

शनिवारी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाची (बुडा) बैठक झाली. बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी आणि बुडाचे नूतन अध्यक्ष आ. राजू सेट यांनी ही माहिती दिली. आयटी पार्कला मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात करण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आली. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आ. सेट यांनी पहिल्याच बैठकीत ही मोठी घोषणा केली. महिलांसाठी शहरात तीन व्यायामशाळा उभारण्याचाही निर्णय बैठकीत झाला.

अनेक वर्षांपासून बेळगावात आयटी पार्कबाबत चर्चा होत आहे. परंतु, ते अस्तित्वात मात्र येत नाही. आता हे आयटी पार्क कणबर्गी बुडा स्कीम नंबर ६१ मध्ये होणार असल्याचे मंत्री व आमदारांनी जाहीर केले.

तीन टप्प्यांत काम

कणबर्गी येथे आयटी पार्कच्या कामाला तीन टप्प्यांत प्रारंभ होणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात १.८ लाख चौरस फूट बांधकाम केले जाणार असून त्यासाठी ७५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात १४.२९ लाख चौरस फुटांचे बांधकाम होणार असून यासाठी ६०० कोटींचा खर्च केला जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात १३.७७ लाख चौरस फुटांचे बांधकाम होणार असून यासाठी ५४८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तिन्ही टप्प्यांमध्ये मिळून १२२३ कोटींचा खर्च करून बारा टॉवर उभारले जाणार आहेत.

महिलांसाठी अत्याधुनिक तीन जिम

बुडाने पहिल्यांदाच महिलांसाठी तीन अत्याधुनिक जिम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ४,५०० चौरस फुटांमध्ये या जिम तयार होणार असून यासाठी ३ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. बेळगावात महिलांसाठी स्वतंत्र जिम नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT