बेळगाव, अंकली : सिंचन विभागात रोजंदारी कामगारांना कायम करण्याची अधिसूचना निघाल्याचे सांगून नोकरी लावण्याचे आमिष दाखवत ४ लाख ५ हजार रुपये उकळल्याप्रकरणी अथणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. प्रदीप लक्ष्मण कांबळे (रा. मुरगुंडी), रामचंद्र बोरय्या पुजारी (रा. चित्रदुर्ग) आणि रावासाहेब श्रीकांत पाटील (रा. उगार खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहे आहेत. तर या प्रकरणातील भरतेश निंगाप्पा शेडबाळे (रा. मुरगुंडी) हा फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, सुभाष बसाप्पा नायक (वय ३३, रा. देवरड्डेरहट्टी) हा बारावी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात असताना वरील तिघांनी त्याच्याशी संपर्क साधला. सिंचन विभागात रोजंदारी कामगारांना कायम करण्याची अधिसूचना असून त्यात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यासाठी एकूण १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
तक्रारदाराकडून ४ ऑक्टोबर २०२१ रोजी तसेच १२ जानेवारी २०२२ रोजी प्रदीप कांबळे यांच्या ॲक्सिस बँक खात्यात १ लाख ५ हजार रुपये, रावासाहेब पाटील यांच्या एचडीएफसी बँक खात्यात १ लाख ५० हजार रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर २८ मार्च २०२२ रोजी एसबीआय खात्यात ७५ हजार आणि एचडीएफसी बँक खात्यात ७५ हजार रुपये, असे एकूण ४ लाख ५ हजार रुपये सुभाष यांच्या कर्नाटक बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे हस्तांतरित करण्यात आले.
मात्र, पैसे घेतल्यानंतरही तक्रारदाराला नोकरी मिळवून देण्यात आली नाही. तसेच घेतलेली रक्कम परत करण्यात आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नायक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर अथणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली. अथणी पोलिस पुढील तपास करत आहेत.