file photo
बेळगाव

Belgaum Theft Case : फळे खरेदी करताना दागिने लंपास

कोल्हापूरच्या महिलेला काकतीत ५ लाखांचा फटका

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : फळे खरेदी करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने पाठीमागून आलेल्या भामट्यांनी हिसडा मारून पळवल्याचा प्रकार काकतीत घडला. साडेतीन तोळ्यांच्या गंठणसह सहा ग्रॅमचे गंठण व एक तोळ्याच्या सोनसाखळीचा या दागिन्यांमध्ये समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली असून चोरट्यांनी ५१ ग्रॅमचे दागिने पळवून नेल्याची नोंद काकती पोलिसांत झाली आहे. याची किंमत ५ लाख १० हजार नोंदवण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिल्पा राजशेखर चिगरी (वय ३७, मूळ रा. नाईक गल्ली, बेनेवाडी, ता. हुक्केरी व सध्या रा. केसरकर कॉलनी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) ही महिला नातेवाईकांकडे काकतीला आली होती. शुक्रवार, २० रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या काकती येथील किल्ला रोडवरील सिद्धेश्वर मंदिराजवळील फळे विक्रीच्या दुकानात फळे खरेदी करत होत्या. त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दागिन्यांना हात घालून जोराचा हिसडा मारला व दुचाकीवरून भरधाव निघून गेला.

शिल्पा यांनी आरडाओरड केली. स्थानिक दुकानदारांनीही पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी तो चोरटा भरधाव वेगाने पसार झाला. त्यानंतर काकती पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT