बेळगाव : बैलहोंगल व कित्तूर कित्तूर तालुक्यात ही दिवसांपूर्वी घडलेल्या चोरी प्रकरणी दोघा चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे नऊ लाखांचे दागिने जप्त केले. चोरट्यांनी हे दागिने आर्थिक संस्थेमध्ये तारण ठेवून त्यावर कर्ज घेतले होते. पोलिसांनी तेथून हे दागिने जप्त केले.
पत्रय्या निंगय्या हिरेमठ (रा. होळे नागलापूर) व अनिलकुमार प्रभुस्वामी हिरेमठ (रा. गोंडलूर चाळ, बैलहोंगल) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
काही दिवसांपूर्वी अवरादी येथील श्रीमती रेणुका आनंद पुरद यांचे घर बंद असताना त्यांच्या घराची कौले काढून चोरट्यांनी आत शिरून चोरी केली होती. या घटनेची नोंद करून घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला होता. २२ जून रोजी उपरोक्त दोघा संशयितांना चिक्कनंदीहळ्ळी क्रॉसजळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. याच चोरट्यांनी डिसेंबर २०२५ रोजी बैलहोंगल ठाणा हद्दीतील संगोळ्ळी येथेही घरफोडी केली होती. येथील चोरीचे दागिने त्यांनी तारण ठेवले होते. ही रक्कम त्यांनी कारचे कर्ज भरण्यासाठी व नवीन दुचाकी घेण्यासाठी वापरले होते.
बेळगावच्या एका फायनान्स कंपनीसह चार फायनान्स कंपन्यांमधून कर्ज घेतले होते. पोलिसांनी या चारीही कंपन्यांमधील दागिने जप्त केले आहेत. बैलहोंगलचे उपअधीक्षक डॉ. विरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूरचे निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.