विजापूर : दुचाकीवरून आलेल्या दोघा बुरखाधारी दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईलने देशी पिस्तूलचा धाक दाखवत सराफी दुकानात दरोडा टाकल्याची घटना सोमवारी चडचण तालुक्यातील हलसंगी गावात दुपारी 3 च्या सुमारास घडली. या घटनेत महादेव कांचागार यांच्या दुकानातील सुमारे 205 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह 1 किलो चांदी असा सुमारे 33 लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. सदर दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
हेल्मेट, जॅकेट व हातात ग्लोव्हज घालून दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी दुकानाजवळ आलेल्या एका वृद्ध महिलेवर पिस्तूल रोखून तिला घाबरवून पाठवले. शिवाय, परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी हवेत दोनवेळा गोळीबारही केला. यामध्ये आत्मलिंग हुगार नावाच्या तरुणाच्या उजव्या पायाला गोळी लागली असून, त्याच्यावर विजापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रामनगौडा हट्टी, डीवायएसपी कट्टीमणी आणि उपनिरीक्षक परशुराम मनगुळी यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. दरोड्यानंतर ते काही क्षणात दागिने घेऊन महाराष्ट्र सीमेच्या दिशेने पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची नोंद झळकी पोलिस ठाण्यात झाली असून, बुरखाधारी दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विशेष पथके नेमून तपासकार्य हाती घेण्यात आले आहे.
गोळीबारात तरुण जखमी
या दरोड्यावेळी शेजारच्या मोबाईल दुकानाचे मालक अनिल गलगली दरोडेखोरांचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करत होते. सदर घटना लक्षात येताच त्यांनी त्यांच्यावर गोळी झाडली. त्यावेळी त्यांच्या बाजूलाच उभ्या असलेल्या 18 वर्षांच्या तरुणाच्या पायाला गोळी लागली. सदर तरुणाला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणाला सध्या कोणताही धोका नसल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.