बेळगाव : सराफी दुकान फोडून 12 लाख रुपये किंमतीचे सुमारे पाच किलो चांदीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी (दि. 18) सकाळी मच्छेत उघडकीस आली. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, महेश गोकुळ काकतीकर (रा. टीचर्स कॉलनी, ओमनगर, शहापूर) यांचे मच्छेत वाघवडे रोडवर गणेश ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. शनिवारी (दि. 17) रात्री 9 वाजता दुकान बंद करुन ते घरी गेले. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कटरच्या साहाय्याने तिजोरी फोडून त्यातील सुमारे पाच किलो वजनाचे चांदीचे दागिने लांबविले. त्याची किंमत जवळपास 10 ते 12 लाख रुपये आहे. रविवारी सकाळी सातच्या सुमारास काहींना दुकानाचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती काकतीकर यांना दिली. त्यांनी तातडीने दुकानाकडे धाव घेतली असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर घटनेची माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक नागनगौडा कट्टीमणी आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त तसेच बेळगाव ग्रामीणचे एसीपींनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठसेतज्ज्ञांना बोलावून ठसे घेण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरु केला आहे.