बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रामदेव गल्लीतील सराफी दुकान फोडल्याची तक्रार पोलिसांत नोंद झाली असून, मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिस पहाटेपासून तपासाला लागले आहेत. तथापि, चोरी नेमकी कितीची आणि चोरटे कोण, दुकानमालक पोलिसांची दिशाभूल का करत होता, हे प्रश्र्न उपस्थित झाले आहेत.
३७ तोळे सोने व चार लाखांची रोकड चोरीला गेली आहे, असे मालक सांगत होता. मात्र, त्यापेक्षाही अधिक सोने व रोख रक्कम त्याने आधीच आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवल्याचे आढळून आले. दुकान मालकाने चक्क पोलिसांची दिशाभूल करत दिवसभर त्यांना पळवले. त्यामुळे त्याने असे का केले, ही माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
रामदेव गल्लीत कृष्णानंद विश्वनाथ वेर्णेकर यांच्या मालकीचे व्ही. पी. वेर्णेकर अँड सन्स ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्री १.३० ते १.५० या दरम्यान चोरट्यांनी हे दुकान फोडले. १.४५ वाजता चोरटे आत गेले तर १ वाजून ४८ मिनिटांनी तिघे चोरटे बाहेर पडल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहेत. शुक्रवारी सकाळी खडे बाजारचे पोलिस निरीक्षक महांतेश धामण्णवर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले.
धामण्णवर यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही दुकानात पोहोचलो तेव्हा कुलूप तोडल्याचे लक्षात आले. परंतु, या दुकानाला लोखंडी शटर नसून लाकडी फळ्या आहेत. कपाटाची चावीदेखील कपाटालाच ठेवून सीसीटीव्ही बंद करून मालक गेल्याचे घटनास्थळावरून स्पष्ट झाले. त्यामुळे सकाळपासूनच आम्हाला शंका होती.