जत्राट : जत्राट गावात गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यूची साथ पसरली असून, २५ हून अधिक जणांना लागण झाल्याचा संशय आहे. गटारी तुंबून अस्वच्छता निर्माण झाल्याने ही साथ पसरली असून, ग्रामपंचायतीकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शशिकला जोल्ले यांनी शनिवारी (दि. १२) दुपारी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन पीडीओ व संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप चौगुले व ग्रामविकासाधिकारी अशोक झेंडे यांनी दोन दिवसांत जत्राट गावातील सर्व ठिकाणी तुंबलेल्या गटारींची स्वच्छता, फॉगिंग मशिनद्वारे फवारणी, औषध पावडरची फवारणी केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार गेले दोन दिवस गावात स्वच्छतेसह औषध फवारणीची कामे सुरू आहेत.
जत्राटमधील सुमारे नऊ रुग्ण आणि श्रीपेवाडीतील दोन रुग्ण अद्याप रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व समस्या क्रमाक्रमाने सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले. तर आमदार जोल्ले यांनी दोन दिवसांत गावात स्वच्छता मोहीम राबवून डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या.
स्वच्छता मोहीम सुरू
सध्या गावातील बस स्थानक, शाळा परिसर, सर्व प्रमुख मार्ग आणि गल्लीमध्ये शनिवारी आणि रविवारी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने तुंबलेली गटारे स्वच्छ केली असून, कचरा उचलण्याचे काम चालू आहे, फॉगिंग मशिनद्वारे फवारणी, औषध फवारणी, गवत आणि तण काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे.