बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद न्यायप्रविष्ट आहे. न्यायदेवता डोळे कधी उघडेल हे मला माहीत नाही. बेळगाव आमच्याकडे आले पाहिजे, अशी आम्ही मागणी करत आहोत. पण मराठी माणूस काय केवळ बेळगावमध्येच नाही आहे. तो जगभरात आहे. शिवाय बेळगाव काय पाकिस्तानात आहे काय, अशी मुक्ताफळे शंभराव्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी उधळली आहेत. त्याबरोबरच आतापर्यंत साहित्य क्षेत्रातील विद्रोहाच्या बाजूने बोलणाऱ्या लिंबाळे यांनी 'विद्रोहालाही मर्यादा आहेत, किती वेळ संघर्ष करणार', अशी शऱणागत भूमिकाही मांडली आहे.
येत्या जानेवारी पुण्यात होणाऱ्या १०० अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. लिंबाळे यांची निवड झाली. त्यानंतर बीबीसी वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत लिंबाळे यांनी विद्रोही चळवळ आणि सीमाप्रश्न या दोन्ही संवेदनशील मुद्द्यांवर मुक्ताफळे उधळली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानी संघटना आहे का? ती अतिरेकी संघटना आहे का? मला काही काळ संघ ही अतिरेकी संघटना वाटायची. बंच ऑफ थॉट्सचा आम्ही विरोध करायचो. आम्हीही विद्रोह केला. पण विद्रोलाही मर्यादा आहेत. किती काळ विद्रोह करायचा? तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे, असे लिंबाळे यांनी म्हटले आहे.
दरवर्षी अ. भा. साहित्य संमेलनात सीमाप्रश्नाची सोडवणूक लवकरात लवकर व्हावी, सीमाभागातील मराठी भाषिकांच्या न्याय हक्काचे संरक्षण व्हावे, असा ठराव करण्यात येतो. बेळगावात २००० मध्ये ७३ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्यानंतरच म्हणजे २००४ मध्ये बेळगावचा सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात नेण्यात आला. त्याकडे दुर्लक्ष करत डॉ. लिंबाळे पुढे म्हणाले, मराठी माणूस केवळ बेळगावात नाही. तो यूएसए, यूके, आस्ट्रेलिया, केरळ, तामिळनाडूमध्ये आहे. म्हणून काय आम्ही सारे जग आम्ही महाराष्ट्रात आणणार आहोत काय? पुढल्या काळामध्ये स्थलांतर अटळ आहे..एक भाषा दुसरीकडे जाणार. दुसरी भाषा इकडे येणार. भाषा एका प्रांतामध्ये बंदिस्त होऊ शकत नाही. कला, संस्कृती बंदिस्त होऊ शकत नाही. या गोष्टी वैश्विक आहेत. त्या वैश्विक पद्धतीनेच आपण समजून घेतल्या पाहिजेत
सीमाप्रश्र्नाविषयी नेमके काय म्हणाले?
बेळगाव काय पाकिस्तानात आहे काय, ते भारतातच आहे. बेळगावमधल्या कन्नड भाषेच्या लोकांबाबतदेखील प्रेम असले पाहिजेत. माझी मातृभाषा कन्नड होती. माझे गाव कन्नड बोलायचे. पण मी कन्नड विसरुन गेलो. कारण मला महाराष्ट्रात राहायचे आहे. त्या भागाची संस्कृती, भाषा स्वीकारली पाहिजेत. आता आपण राष्ट्रावर प्रेम केले पाहिजे. एक सुंदर राष्ट्र, एक सुंदर माणूस निर्माण करणे हे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मी लिहितोय याचा मला आनंद आहे.