बेळगाव : राज्य सरकारने गोरगरिबांसाठी अन्नभाग्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बीपीएल कार्डधारकांना मोफत तांदूळ पुरवठा केला जातो. प्रतिव्यक्ती 10 किलोप्रमाणे तांदळाचे वितरण केले जाते. मात्र, या तांदळाचा काळाबाजार होत असून बेकायदेशीररित्या विकला जात आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते ऑक्टोबर 2025 यादरम्यान बेकायदेशीर रेशन तांदूळ वाहतुकीची 482 प्रकरणे दाखल झाली आहे. तसेच 29,603 क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरातसह विविध राज्यांमध्ये तांदूळ पाठवण्यात येत होता. अधिकाऱ्यांनी कारवाई करून हा तांदूळ जप्त केला आहे. सीमावर्ती जिल्हे तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये भातशेतीचे प्रमाण अधिक आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेशनच्या तांदळाची बाहेर विक्री करण्यात येत असल्याच-ी प्रकरणे उघडकीस आली आहे.
बेकायदेशीर तांदूळ वाहतुकीचे प्रकरणे वाढली असून यामागे मोठे रॅकेट असल्याने इतर राज्यांमध्ये तांदूळ पाठविण्यात येत आहे. अनेकवेळा बेकायदेशीर तांदूळ वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळते. मात्र, त्यांना छाप्याची पूर्वकल्पना मिळत असल्यामुळे ते आपला मार्ग बदलतात. त्यामुळे कारवाई करताना अडचणी येत असल्याचे अन्न व नागरीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर तांदूळ थेट सरकारी गोदामे आणि रेशन दुकानांमधून गोळा केला जातो. तांदाळाची अधिक किमतीने विक्री करण्यासाठी तो पॉलिश केला जातो. त्यानंतर तो विविध राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. अनेक जिल्ह्यांमध्ये काही टोळ्या सक्रिय असून तांदळाची तस्करी करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तांदूळ वाहतूक करण्ााऱ्या वाहनांना सुरक्षा देऊन तस्करी केली जाते. ट्रकच्या मागे व पुढे वाहने ठेवून तांदळाची वाहतूक केली जाते. तसेच अनेकवेळा अन्न आणि पोलिस विभागाशी संपर्क असलेल्यांना छाप्याची पूर्वसूचना मिळते. त्यामुळे ते त्यांचे मार्ग बदलतात. काही प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांना धमकावून तसेच हल्ले करून तांदूळ वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे.