खानापूर : शेतात काम करताना सर्पदंश होऊन सर्पमित्र शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सातेरी विठ्ठल सुतार (वय ४०, रा. इदलहोंड, ता. खानापूर) असे त्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सातेरी हे मंगळवारी दुपारी गावाजवळील आपल्या चुलतभावाच्या शेतात काम करत होते. यावेळी अचानक विषारी सापाने त्यांना दंश केला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने आधी गणेबैल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती चिंताजनक दिसून आल्याने डॉक्टरांनी त्यांना बेळगावला नेण्याचा सल्ला दिला. त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सातेरी हे अनुभवी सर्पमित्र होते. हजारो सापांना त्यांनी जीवदान दिले होते. विनामूल्य साप पकडून त्यांनी सर्पमित्र म्हणून चांगली ओळख मिळवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे. खानापूर पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. शेकडो सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्राचा सर्पदंशाने अकाली झालेला मृत्यू सर्वांना चटका लावून गेला आहे.