बेळगाव

Belgaum News: शहरात आता हायब्रीड वीज वितरण

केपीसीएलकडून कामाला प्रारंभ : वीजपुरवठा त्वरित सुरळीत होणार, ईव्ही चार्जिंगसाठीही उपयुक्त

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (केपीटीसीएल) वीज उपकेंद्रांच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यांतर्गत जिल्ह्यात चार्जिंगसाठी आवश्यक क्षमतेचे हायब्रीड वीज वितरण नेटवर्क उभारले जात आहे. या हायब्रीड सिस्टीममध्ये कोणत्याही युनिटमध्ये व्यत्यय आल्यास दुसऱ्या लाईनद्वारे वीज त्वरित प्रसारित केली जाते. विशेष म्हणजे ही प्रक्रिया क्षणार्धात घडते. या हायब्रीड सिस्टीममध्ये लोडसाठी आवश्यक असलेला बॅकअप तयार ठेवला जातो. शहरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत चालला असून त्यासाठी ईव्ही चार्जिंगसाठी स्टेशन उभारण्यासाठी या नेटवर्कचा उपयोग होणार आहे.

हेस्कॉमच्या वीज वितरणाबाबत ग्राहकांमध्ये नाराजी आहे. पहिल्या पावसातच हेस्कॉमची वीज यंत्रणा कोलमडली. ग्रामीण भागात तीन ते चार दिवस विजेचा पत्ता नव्हता. उपनगरातही ३० ते ४० तास वीज गायब होती. त्यामुळे, केपीसीएलने आता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हायब्रीड करंट नेटवर्कवर भर देऊन कामाला सुरुवात केली आहे. नेहरुनगरमधील ११० केव्ही क्षमतेच्या उपकेंद्राचे हायब्रीट करंट नेटवर्क अंतर्गत काम पूर्ण झाले आहे.

कणबर्गी ११० केव्ही आणि श्रीनगर ३३ केव्ही उपकेंद्रात काम चालू आहे. सदाशिवनगर ३३ केव्ही उपकेंद्रांचे ११० केव्हीमध्ये रुपांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मच्छेतील २२० केव्ही क्षमतेच्या उपकेंद्राचे रुपांतर करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाला सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी बिम्स परिसरात ११० केव्हीचे उपकेंद्र व कणबर्गीत संपूर्ण शहराच्या विद्युत प्रणालीचे व्यवस्थापन करण्यासाठी २२० केव्ही स्विचिंग स्टेशन उभारले जात आहे.

जिल्ह्यातील उद्योग, आयटी, सेवा क्षेत्र आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी सुरळीत वीजपुरवठ्याची आवश्यकता आहे. केपीसीएलने उच्चदाबाच्या सुमारे ७०० किमी लांबीच्या ११ केव्ही भूमिगत केबलघालण्याचे काम हाती घेतले आहे. याव्यतिरिक्त, हायब्रीड करंट नेटवर्कच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेल्या उपकेंद्रांना चार्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ओव्हरहेड पॉवर लाईन्समुळे समस्या निर्माण होत असल्याने त्या लाईन्स भूमिगत केल्या जात आहेत. जिल्ह्यात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मजबूत विद्युत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे भविष्यात शहरातील ग्राहकांना लाभ होणार आहे.

ईव्ही चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर लक्षणीयरीत्या वाढत आहे. यासोबतच, परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक बसेसकडेही लक्ष वळवले आहे. त्यानुसार वायव्य परिवहन महामंडळ एक ईव्ही बस चार्जिंग युनिट उभारण्याची योजना आखत आहे. यासाठी आवश्यक असलेल्या ११ केव्ही पॉवर ग्रिडची क्षमता केपीटीसीएलने वाढवली आहे. यामुळे शहरांमध्ये खाजगी कंपन्यांनी उभारलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशन्ससाठी वीज पायाभूत सुविधाही उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT