file photo
बेळगाव

Belgaum Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खून

प्रियकराच्या मदतीने मृतदेह शेतवडीत पुरला

पुढारी वृत्तसेवा

खडकलाट : अनैतिक संबंधांना विरोध होत असल्याने पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना खडकलाट (ता. निपाणी) येथे उघडकीस आली. फेब्रुवारी महिन्यात घडलेली ही घटना तब्बल साडेपाच महिन्यांनंतर उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

राघू सिद्धाप्पा गावडे (वय ४०, रा. खडकलाट) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खडकलाट पोलिसांनी संशयित पत्नी भंगारी राघू गावडे (वय ३२, रा. खडकलाट) आणि तिचा प्रियकर मावसभाऊ रामा मायाप्पा राणगे (वय ४०, रा. बेनाडी) यांना अटक केली आहे.

खडकलाट येथील वड्डर गल्लीत राहणाऱ्या राघू गावडे यांचा विवाह सुमारे २० वर्षांपूर्वी भंगारी हिच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगी (वय १३) व एक मुलगा (वय ११) आहे. राघूला दारूचे व्यसन होते. तो कामानिमित्त वारंवार बाहेरगावी जात असे. या काळात त्याचा मावसभाऊ रामा राणगे याची भंगारी हिच्याशी जवळीक वाढून त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

राघूला या संबंधांचा संशय आल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. त्यामुळे प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी भंगारी आणि रामा यांनी राघूचा खून करण्याचा कट रचला. फेब्रुवारीत एका रात्री राघू दारूच्या नशेत घरी आल्यानंतर दोघांनी मिळून त्याला अमानुष मारहाण केली. त्यानंतर त्याला घाटगे मळ्याजवळील शेतवडीत नेऊन गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतात खड्डा खणून पुरून टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गेल्या साडेपाच महिन्यांपासून राघू दिसत नसल्याने नातेवाईकांनी विचारणा केली असता तो कामासाठी बाहेरगावी गेल्याचे भंगारी सांगत होती; पण तिच्या संशयास्पद हालचालींमुळे नातेवाईकांचा संशय बळावला. गेल्या दोन दिवसांपासून नातेवाईकांनी भंगारीची कसून चौकशी केली असता तिने पतीचा खून करून मृतदेह शेतवडीत पुरल्याची कबुली दिली. त्यानंतर तिला खडकलाट पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन, चिकोडीचे डीवायएसपी गोपाळकृष्ण गौडर, निपाणी मंडलचे पोलिस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली खडकलाट पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसूर व पथकाने दोन्ही संशयितांना अटक केली. पोलिसांनी शुक्रवारी मृतदेह पुरलेल्या ठिकाणी पाहणी केली. काही महिन्यांपूर्वी हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी येथे घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर आता खडकलाटमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT