बेळगाव : हुंचेनट्टीत साडेसहा लाखांची घरफोडी घडल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून याची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. घरमालक दुर्गेश महादेवाप्पा होसमनी (रा. बसवाण गल्ली, हुंचेनट्टी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, १० ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास घराला कुलूप लावून सर्व कुटुंबीय बाहेर गेलो होतो. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास परत आलो असता घराच्या मागील दरवाजाचे कडीकोयंडे तोडल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी बेडरुममधील तिजोरीचे कुलूप तोडून आतील दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. यामध्ये मंगळसूत्र, नेकलेस, सोनसाखळ्या, अंगठ्या, चांदीचे नेकलेस व अन्य चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे.
याशिवाय पावणेतीन लाख रुपयांची रोख रक्कमही चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाची नोंद करुन घेतली असून उपनिरीक्षक संतोष दळवाई पुढील तपास करत आहेत.