बेळगाव : देशभर इराण-अमेरिका व इस्रायल युद्धामुळे इंधन व गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, बेळगाव तालुक्यातील कट्टणभावी गावात घरोघरी गोबर गॅस असल्याने इंधनाची समस्या जाणवत नाही. गोबर गॅसचा वापर करत गाव स्वयंपूर्ण बनले आहे. 250 घरांपैकी 200 घरांमध्ये गोबर गॅस आहेत. यापूर्वी घरोघरी मातीच्या चुली अशी म्हण होती. त्यामध्ये बदल करुन याठिकाणी घरोघरी गोबर गॅस असे म्हणावे लागत आहे.
गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि दुग्धव्यवसाय आहे. प्रत्येक घरात गायी, म्हशी, बैल पाळले जातात. जनावरांचे शेण आणि शौचालये यांचा वापर करुन गोबर गॅस तयार केला जातो. प्रत्येक घराच्या परसात गोबर गॅस आढळतात. या गॅसचा वापर स्वयंपाकासाठी केला. यामुळे ग्रामस्थांना सिलिंडर संपला, बुकिंग करायचे अशी चिंता भेडसावत नाही. ते या गॅसवर स्वयंपाक करुन निर्धास्तपणे जीवन जगत आहेत. गेल्या 40 वर्षांपासून नैसर्गिक गॅसचा वापर करत आहेत. सध्या प्रत्येक कुटुंबाला सिलिंडर मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर यासाठी महागाईचा फटकाही सहन करावा लागत आहे. मात्र, गोबर गॅस वापरणाऱ्यांना या समस्या दिसून येत नाहीत. सिलिंडर मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत नाही. यामुळे कट्टणभावी गॅसबाबत स्वयंपूर्ण बनले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या प्रयत्नांमुळे 1990-95 दरम्यान जनजागरण संस्था व खादी ग्रामोद्योग संघाच्या सहकार्याने बेळगाव, हुक्केरी, खानापूर तालुक्यात सुमारे 30 हजार घरांमध्ये गोबर गॅस प्रकल्प उभारले गेले. पूर्वी स्वयंपाकासाठी लाकडांचा वापर करण्यात येई. यासाठी वृक्षतोड करावी लागे. धुरामुळे महिलांना त्रास होत असे. हे लक्षात घेऊन कागणीकर यांनी धूरमुक्त स्वयंपाकासाठी गोबर गॅस हा उत्तम पर्याय असल्याचे लोकांना पटवून दिले. परिसरात ‘दीनबंधू’ प्रकारचे गोबर गॅस बांधण्यात आले. यासाठी त्यांना प्रारंभी खूप संघर्ष करावा लागला. आज त्याचे फायदे दिसत आहेत.