बेळगाव : शहरातील महिला वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. कावेरी उमेश नायक (वय २१, मूळ रा. काटाबळी, ता. हुक्केरी, सध्या रा. महिला वसतीगृह आझमनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिने आपल्या वाढदिवशीच जीवन संपवल्याने यामागील कारणाचा शोध सुरु आहे.
या प्रकरणाची एपीएमसी पोलिसांत नोंद झाली आहे. त्यांनी सांगितले की, सदर तरुणी बीएसस्सीचे शिक्षण घेत होती. पुढील काही महिन्यांत तिचे शिक्षण पूर्ण होणार होते. एका पोलिस कॉन्स्टेबलशी तिचा तीन महिन्यांपूर्वी साखरपुडाही झाला आहे. सोमवारी तिचा वाढदिवस होता. तिने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेतल्याचे दिसून आले.
तिच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजलेले नाही. परंतु, पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तिला आणखी पुढे शिकायचे होते. परंतु, घरच्यांनी लग्न ठरवल्याने ती मानसिक अस्वस्थ होती. यातूनच तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एपीएमसी पोलिसांत नोंद झाली असून पोलीस निरीक्षक उस्मान आवटी तपास करीत आहेत.