Hindalga Jail 
बेळगाव

Belgaum News: कारागृहात जॅमर; हिंडलग्यात कहर

ग्रामस्थांना फटका : ऑनलाईन सेवेत अडथळे, सरकारी कामांनाही फटका

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : हिंडलगा कारागृहात मोबाईलचा वापर होऊ नये तसेच गैरकृत्यांना आळा बसावा यासाठी कारागृह प्रशासनाने जॅमर बसविला आहे. परंतु, त्याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. जॅमरमुळे कारागृह परिसरातील ऑनलाईन सेवा ठप्प झाल्या असून सरकारी कामेही संथगतीने होत आहेत. यामुळे ग्रामस्थांनी जॅमर हटविण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून हिंडलगा कारागृहात जॅमर बसविण्यात आला आहे. परिणामी नेटवर्क समस्या येत आहे. कोणत्याही कंपनीच्या मोबाईल कनेक्शनला रेंज येत नाही. याचा फटका अधिक प्रमाणात गावकऱ्यांना बसत आहे. त्याचबरोबर बँका, सोसायटी, सरकारी कार्यालये, शाळा, हायस्कूल यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या गावात मतदार यादी विशेष पुनरीक्षण अभियान सुरू आहे. प्रत्येक मतदाराची छाननी करण्यात येत आहे. हे काम ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. परिणामी छाननी करताना अडथळा येत आहेत. त्याचबरोबर गृहज्योती योजनेसाठी नव्याने नोंदणी करण्यात येत आहे. रेंजअभावी ही कामेदेखील संथगतीने सुरू आहेत. परिणामी लोकांना नोंदणीसाठी सकाळपासून तिष्ठत उभे राहावे लागत आहे.

बेळगाव शहराला लागून असल्याने गावाचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. गावात अनेक उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यांनाही जॅमरचा फटका बसत आहे. अनेक दुकानांतून ऑनलाईन पेमेंटची सोय नाही. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता जॅमरमुळे रेंज येत नसल्याची अडचण सांगण्यात येत आहे. त्यामुळे, ग्राहकांचीही गोची होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT