बेळगाव

Heroin seizure: सुळगेत अडीच लाखांचे हेरॉईन जप्त; दोघांना अटक

सीसीबी पोलिसांची कारवाई; श्वान पथकाच्या साहाय्याने लावला छडा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : ग्रामीण भागातही आता हेरॉईन हा महागडा अमली पदार्थ राजरोजपणे मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुळगेतील (हिं.) एका घरात लपवून ठेवलेले सुमारे 13 ग्रॅम हेरॉईन सीसीबी पोलिसांनी शनिवारी (दि. 18) छापा टाकून हस्तगत केले. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत 2 लाख 60 हजार रुपये आहे.

याप्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांच्यावर काकती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नागेश मधुकर भगत (वय 35, मूळ रा. सावंतवाडी, सध्या रा. देशपांडे गल्ली, सुळगा) व राहुल जोतिबा जाधव (33, मूळ रा. कंग्राळी खुर्द, सध्या रा. देशपांडे गल्ली, सुळगा) अशी त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे हेरॉईनचा शोध घेण्यासाठी पोलिस श्वानाचा वापर करण्यात आला.

नागेश व राहुल यांनी मुंबईतील कोळीवाड्यात राहणाऱ्या एकाकडून हेरॉईन खरेदी केले होते. त्यानंतर या दोघांनी 12.92 ग्रॅम हेरॉईनच्या 119 लहान पुड्या तयार केल्या. त्या विकण्याचा त्यांचा बेत होता. याबाबतची माहिती सीसीबी पोलिसांना मिळाली. त्यानंतर सीसीबी पोलिस निरीक्षक मंजुनाथ नायक, पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्वान पथकाचा आधार घेत सुळगेतील संबंधित ठिकाणी छापा घातला असता हेरॉईन सापडले. वरील दोघांकडून हेरॉईन आणि दोन मोबाईल जप्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT