बेळगाव

Belgaum Heroin Seizure : हेरॉईन विक्रीप्रकरणी दोघांना अटक

१४.४९ ग्रॅम हेरॉईन पावडर, रोख दहा हजार रुपये आणि दोन मोबाईल फोन असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जय किसान भाजी मार्केटजवळ हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या दोघांना सीसीबी पोलिसांनी छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून १४.४९ ग्रॅम हेरॉईन पावडर, रोख दहा हजार रुपये आणि दोन मोबाईल फोन असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (दि. १७) करण्यात आली.

महांतेश रामण्णा अंबिगेरी (वय ३७, रा. आंबेडकर गल्ली, अलारवाड) आणि आकाश सुरेश नंदी (वय २८, रा. हरी कॉलनी, येळ्ळूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सीसीबीचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ नायक यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहकाऱ्यांसह जय किसान भाजी मार्केटजवळ छापा टाकला. यावेळी सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंधित हेरॉईनची विक्री करण्याचा प्रयत्न करताना दोघांना पकडण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या तपासणीत १२४ छोट्या पाकिटांमध्ये भरलेली १४.४९ ग्रॅम हेरॉईन पावडर आढळून आली. या हेरॉईनची किंमत सुमारे दोन लाख ९० हजार रुपये असून, दहा हजार रुपये रोख आणि दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. संशयितांनी महाराष्ट्रातील अम्मा नावाच्या महिलेकडून हेरॉईन आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात तिसऱ्या संशयिताचा सहभाग असून तिच्या अटकेबाबत तपास सुरु आहे. याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT