बेळगाव

कंग्राळीत जोरदार पावसाने घरांतून पाणी

वारा, गारा यामुळे दाणादाण : नियोजनाअभावी नुकसान झाल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

कंग्राळी : कंग्राळी खुर्द परिसराला मंगळवारी (दि. ५) सायंकाळी जोरदार वारा, गारा व मुसळधार पावसाने झोडपल्याने दाणादाण उडाली. गटारी व रस्त्यावरील पाणी घरांतून घुसल्यामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले. गटारी व रस्त्याच्या चुकीच्या नियोजनामुळे घरांतून पाणी शिरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा सुटला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यात गारांचाही मारा सुरू झाला. केवळ दहाच मिनिटांत गटारी तुडुंब भरून पाणी रस्त्यावर आले. गावाच्या मुख्य रस्त्यावरील पाणी योग्य नियोजनाअभावी रस्त्यावर आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसराला तलावाचे स्वरूप निर्माण झाले. जवळच असलेल्या परशुराम जाधव यांच्या घरात पाणी शिरले. यामध्ये गृहोपयोगी साहित्य भिजून गेले. जेवण व रात्र कोठे काढायची, असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे.

भरत जाधव यांच्या इलेक्ट्रिक दुकानात पाणी शिरून मोठे नुकसान झाले. स्मार्ट सिटीअंतर्गत झालेल्या रस्ता व गटारीचे नियोजन, पाणी निचरा याचा विचार झाला नसल्याचा आरोप जाधव परिवाराने केला आहे. सोसाट्याचा वारा व गारांमुळे अनेकांच्या परसातील केळी, पपई व अन्य झाडे उन्मळून पडली. मराठी शाळेच्या आवारातील झाड उन्मळून पडले.

रामदेव गल्लीत काही जणांनी छताचे पाणी रस्त्यावरच सोडल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले. नव्यानेच बांधलेल्या बसवण्णा मंदिराचा कळसही उडाला आहे. शेतातील २५ पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे मिरची, फ्लॉवर, दोडकी, सिमला मिरची, कोथिंबीर या पिकांमध्ये पाणी साचले. पिकांची अनेक झाडे वाऱ्यामुळे कोसळली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT