Temperature file photo
बेळगाव

Belgaum temperature: उष्णतेचा तडाखा ; तापमान ४१ अंशांवर

पुढील आठवडाभर तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

अंकली : ग्लोबल वॉर्मिंग, बदलते वातावरण, झाडांची वाढती कत्तल आणि सिमेंटच्या वाढत्या इमारतींमुळे यंदाचा एप्रिल महिन्यातील उन्हाळा सर्वाधिक उष्ण ठरला आहे. एप्रिल महिन्यातील ३० पैकी २१ दिवस तापमान ४० अंशांच्या वर राहिले. १० एप्रिल रोजी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत गेली. २७ एप्रिल रोजी यंदाचे सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

यंदा एप्रिल महिना अत्यंत तापदायक ठरत असून सकाळपासूनच प्रचंड उकाड्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. मागील 3 दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर सुरू असला तरी हवेतील आर्द्रता कमी झाल्याने कोरडे व तप्त वारे वहात आहेत. त्यामुळे उष्णतेच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. वीज दुरुस्तीच्या कामांमुळे अनेक ठिकाणी दिवसभर वीजपुरवठा खंडित होत असल्याने पंखे, कूलर आणि एसी बंद राहून नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. पुढील आठवडाभर तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मानवी शरिराचे सामान्य तापमान ३६.४ ते ३७.२ अंश सेल्सिअस (९७.५ ते ९८.९ फॅरेनहाइट) असते. उष्णतेशी संबंधित आजारांमध्ये अंगावर पुरळ, हात-पाय व घोट्यांना सूज, स्नायूंमध्ये पेटके, उष्माघात, गोंधळ, थकवा आदी लक्षणांचा समावेश होतो. उष्म्यापासून बचावासाठी थंड ठिकाणी राहणे. पाणी हे सर्वोत्तम पेय आहे. आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घेणे. शरिराचे तापमान नियमित तपासणे. स्नायूंमध्ये वेदना असल्यास इलेक्ट्रोलाइट्सयुक्त द्रव (ओआरएस) घेणे. वेदना दीर्घकाळ टिकल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

प्रौढांमध्ये गोंधळ, चिडचिड, मानसिक स्थितीत बदल, गरम व कोरडी त्वचा, शरिराचे तापमान ४० अंशांपेक्षा अधिक, डोकेदुखी, चक्कर, मूर्च्छा, स्नायू कमकुवत होणे किंवा पेटके येणे ही लक्षणे उष्म्याची दिसून येतात. मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, तोंड कोरडे पडणे, त्वचा कोरडी होणे आणि अश्रू न येणे अशी लक्षणे आढळतात. दुपारी १२ ते ३ याकाळात उन्हात बाहेर पडणे टाळावे. अती श्रमाची कामे करू नये. अनवाणी बाहेर जाऊ नये. स्वयंपाक करताना जागा हवेशीर ठेवा. अल्कोहोल, चहा, कॉफी, कार्बोनेटेड व साखरयुक्त पेये टाळावे. उच्च प्रथिनेयुक्त व शिळे अन्न खाणे टाळणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT