बेळगाव : बँकेत पैसे मिळणार आहेत, असे सांगून महिलेला रस्त्यात लुटणारे तसेच बसथांब्यावर गर्दीत बॅगेतील दागिने चोरणार्या दोघांना हारुगेरी पोलिसांनी अटक केली. सखोल चौकशी केली असता या दोघांनी हारुगेरीसह चिकोडी, तेरदाळ, निपाणी, मुडलगी, कागवाड, अथणी, संकेश्वर येथे नऊ प्रकरणात सामील असल्याचे स्पष्ट झाले. दस्तगीर गुलाब शेख (रा. कोल्हापूर) व कुशाप्पा तळवार (रा. देसाई इंगळी, ता. चिकोडी) अशी संशयितांची नावे आहेत.
रुक्कव्वा कृष्णाप्पा कांबळे (रा. हिडकल) या महिलेने 1 जून रोजी हारुगेरी पोलिसांत फिर्याद दिली होती. संशयितांनी अळगवाडीतील बँकेत तुझ्या नावावर 40 हजार रुपये आले आहेत ते काढून आणुया, असे सांगत या महिलेला सोबत घेतले. दुचाकीवरुन ते सर्वजण हिडकलजवळील सैदापूर शाळेजवळ गेले.
येथे गेल्यानंतर तुझ्या गळ्यातील बोरमाळ पाहून बँकेत रक्कम देणार नाहीत. ती काढून ठेव असे म्हणत ती काढून घेऊन महिलेला तेथेच सोडून पोबारा केला. याचा तपास करताना उपरोक्त दोघेजण सापडले. यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी असा प्रकार केल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून 64 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, 80 हजाराची दुचाकी असा तब्बल 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
याच संशयितांनी दुसर्या एका प्रकरणात विद्यावती ऊर्फ संगीता राजेंद्र कुडची (रा. शहापूर, बेळगाव) या महिलेचे 16 ऑक्टोबर रोजी बॅगेतून दागिने चोरले होते. सदर महिला दुपारी साडेबाराच्या सुमारास हारुगेरी क्रॉसजवळून बसने मिरजेला निघाल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा उठवत संशयितांनी तिच्या बॅगेतील सहा तोळ्यांचे दागिने चोरले होते. या प्रकरणाचीही नोंद झाली होती.
तिचे चोरीला गेलेले 53.5 ग्रॅमचे दागिने व चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. या सर्व प्रकरणात पोलिसांनी 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली हारुगेरीचे निरीक्षक रतनकुमार जिरग्याळ, उपनिरीक्षक माळप्पा पुजारी, उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, पोलिस बी. एल. होसट्टी, रमेश मुंदीनमनी, ए. एस. शांडगे, एच. आर. अंबी, पी. एम. सप्तसागर, जिल्हा पोलीस मुख्यालयातील तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कण्णवर यांनी ही कारवाई केली.