बेळगाव

Belgaum News : हलशीतील पुनरुज्जीवित तलावांमुळे जलसंजीवनी

प्यास फाउंडेशनचा उपक्रम यशस्वी; पक्ष्यांचीही वाढली वर्दळ

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : यंदा पावसाने ओढ दिल्याने खानापूर तालुक्यातील बहुतांश तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ शकलेला नाही. मात्र, हलशी येथील पुनरुज्जीवित करण्यात आलेले दोन तलाव याला अपवाद ठरले आहेत. अल्प पावसातही हे दोन्ही तलाव पाण्याने भरले असून, त्यातील नैसर्गिक झरेही प्रवाहित आहेत. प्यास फाउंडेशनने एकेपी फेरोकास्टच्या सीएसआर सहकार्यातून राबविलेल्या जलसंवर्धन उपक्रमाचे हे फलित मानले जात आहे.

तलावांमधील गाळ काढणे आणि जलसाठवण क्षमता वाढविण्याच्या प्रयत्नांमुळे पावसाचे पाणी साठवून ठेवण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे, पावसाचे प्रमाण कमी असतानाही तलावांतील पाणीसाठा टिकून राहिला असून नैसर्गिक झरेही जिवंत असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील अन्य तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर असताना हलशीतील हे तलाव मात्र पाण्याने भरलेले आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी, शेतीसाठी या जलसाठ्याचा मोठा आधार मिळू शकतो. प्रकल्पाचे वैशिष्ट्य केवळ जलसाठवणुकीपुरते मर्यादित नाही. तलावाच्या मध्यभागी पक्ष्यांसाठी स्वतंत्र बेटाची निर्मिती करण्यात आली आहे. या बेटावर आतापासूनच पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे.

पावसाचे पाणी अडविणे, भूजलसाठा वाढविणे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरज बनली आहे. हलशीतील दोन तलावांचा अनुभव ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी दिशादर्शक ठरू शकतो. लोकसहभाग, सामाजिक संस्था आणि उद्योगांच्या सीएसआर निधीची सांगड घातल्यास गावोगावी पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण करता येऊ शकतो, हे या उपक्रमाने अधोरेखित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT