खानापूर : पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळाचे सावट गडद होत असताना हत्ती समस्येने डोके वर काढल्याने खानापुरातील शेतकरी त्रस्त झाला आहे. भीमगड अभयारण्यातील पाली, देगाव, कोंगळा या म्हादई नदी परिसरापासून ओलमनी, निलावडे या मलप्रभा नदी काठावरील शेतवाडीपर्यंत निम्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हत्तींच्या उपद्रवाचा त्रास सहन करावा लागत आहे. हत्तींनी ऊस आणि भात शिवारांकडे आपला मोर्चा वळविण्यापूर्वी वनखात्याने या समस्येचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
खानापूर वन उपविभागातील विविध भागांत हत्तींच्या कळपाला पुन्हा जंगलात परतविण्यासाठी वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. या कळपात नऊ हत्ती असून बुधवारी रात्री भीमगड वन्यजीव क्षेत्रातील पाली गावाजवळील भाताच्या शेतात सात हत्ती आढळून आले. या कळपात एका नर हत्तीबरोबर दोन पिल्लेही असल्याने वनखात्याने विशेष खबरदारी घेतली आहे. साहाय्यक वनसंरक्षक बसवराज वाळद आणि भीमगडचे वनक्षेत्रपाल सय्यदसाब नदाफ यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत वन कर्मचाऱ्यांनी कोंबिंग ऑपरेशन राबविले. यावेळी पालीजवळील भाताच्या शेतात हत्तींचा कळप असल्याची खात्री करण्यात आली. पाली, हेम्मडगा, अबनाळी, डोंगरगाव आणि शिरोलीवाडा परिसरात हत्तींची हालचाल दिसून आली आहे. हत्ती भाताच्या शेतांच्या कडेला फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हत्तींना जंगलाच्या दिशेने परतविण्यासाठी वन कर्मचारी विविध उपाययोजना करीत आहेत. मात्र, हत्ती पुन्हा भाताच्या शेतांकडे वळत असल्याने त्यांना जंगलात परतविणे आव्हान ठरत आहे. स्थानिकांच्या मदतीनेही हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. पालीवळील जंगल रस्त्याच्या कडेला हत्तींचा कळप दिसल्याने काही दुचाकीस्वार घाबरून पळून गेले. वन कर्मचारी घटनास्थळी पोचेपर्यंत हत्तींचा कळप तेथून पुढे निघून गेला होता. तालुक्यात अलीकडे प्रथमच अशा प्रकारे हत्तींच्या कळपाचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसून आला आहे.
हल्याळ, कॅसलरॉक, जगलबेट, तिनईघाट आणि गणेशगुडी या जंगल परिसरातून अन्नाच्या शोधात हत्तींचा कळप खानापूर परिसरात आला आहे. अद्याप ऊस आणि भात पिकाची पूर्ण वाढ झालेली नाही. नजीकच्या काळात पाऊस झाला आणि पिकांच्या कापणीपर्यंत कळप तालुक्यातच राहिला तर शेतकऱ्यांना यंदा सुगीच नको होणार आहे. या कळपात नर हत्तीसोबत पिल्ले असल्यामुळे हा कळप अधिक संवेदनशील आणि धोकादायक ठरु शकतो. त्यामुळे लोकांनी वनाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय हत्तींजवळ जाऊ नये. हत्ती दिसल्यास आरडाओरडा करु नये, फटाके फोडू नयेत किंवा हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन वनखात्याने केले आहे.