खानापूर : हलशी-मेरडा-नागरगाळी रस्त्याची दूरवस्था, खड्डे आणि धुळीमुळे प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थ हैराण झाले होते. अपघातांचा धोका वाढल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी जणू मृत्यूचा सापळाच बनला होता. या गंभीर समस्येवर दैनिक ‘पुढारी’ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करुन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले. अखेर या वृत्ताची दखल घेत रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.
तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे या महत्त्वाच्या रस्त्याचे काम रखडले होते. त्यामुळे रोज या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती, तर धुळीमुळे परिसरातील लोकही त्रस्त होते. या परिस्थितीचे वास्तव ‘पुढारी’ने वृत्तांकनातून मांडत संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले. दरम्यान, आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या प्रश्नात लक्ष घालून प्रशासकीय पातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून निधी उपलब्ध झाला. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्याच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सातत्याने मांडल्यास त्याची दखल घेतली जाऊ शकते, याचे मेरडा-नागरगाळी-हलशी रस्त्याचे काम हे उदाहरण ठरले आहे. ‘पुढारी’च्या वृत्तांकनामुळे या प्रश्नाला वाचा फुटली आहे. यामुळे प्रवासी आणि ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दर्जावर लक्ष ठेवण्याची गरज
रस्त्याचे काम सुरु होणे ही दिलासादायक बाब असली तरी ते दर्जेदार आणि टिकाऊ होणे तितकेच महत्त्वाचे आहे. कामात निकृष्ट साहित्याचा वापर होणार नाही आणि रस्त्याची गुणवत्ता कायम राहील, यासाठी संबंधित विभागाने काटेकोर देखरेख ठेवावी. तसेच स्थानिक लोकांनीही कामाच्या दर्जावर लक्ष ठेवून आवश्यक त्या सूचना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.