हिरेमुनवळ्ळी : नुकसानीची पाहणी करताना ईओ रमेश मेत्री, पीडीओ विरेश सज्जन, मंजुनाथ हत्ती. 
बेळगाव

Belgaum Fire Incident : आगीत ग्राम पंचायत कार्यालय भस्मसात

हिरेमुनवळ्ळीत दुर्घटना : शॉर्टसर्किटचा संशय, कागदपत्रांसह १० लाखांचे साहित्य जळाले

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : खानापूर तालुक्यातील हिरेमुनवळ्ळी ग्राम पंचायत कार्यालयाला बुधवारी (दि. १६) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागून कार्यालयातील महत्त्वाच्या कागपत्रांसह दोन संगणक, लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे.

गावच्या मध्यवर्ती भागात ग्राम पंचायत कार्यालयाची जुनी कौलारु इमारत आहे. मंगळवारी रात्री ऋषिपंचमी असल्याने परिसरात कमी वर्दळ होती. पहाटे दोनच्या सुमारास कार्यालयाला आग लागल्याने कुणालाही मदतीसाठी धाव घेता आली नाही. बुधवारी सकाळी कार्यालयातून धूर व जळालेल्या वस्तू निदर्शनास आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आगीची माहिती तालुका पंचायत प्रशासन व खानापूर पोलिसांना देण्यात आली. तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

याबाबत खानापूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याची माहिती मेत्री यांनी दिली. ग्राम पंचायत कार्यालयाची इमारत जुनी झाल्याने ती पाडून त्याच ठिकाणी नवीन कार्यालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत नवीन कार्यालयासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नवीन इमारत उभी होईपर्यंत ग्राम पंचायतीचे कामकाज भाडोत्री इमारतीतून करण्याची तयारी सुरु होती. यासाठी कार्यालयातील कागदपत्रांचे स्वतंत्र गठ्ठे बांधून ठेवण्यात आले होते.

बुधवारी हे साहित्य भाडोत्री इमारतीत हलविण्यात येणार होते. मात्र, स्थलांतराच्या काही तास आधीच लागलेल्या आगीत कार्यालयातील साहित्य व महत्त्वाचे रेकॉर्ड जळून खाक झाले. ग्राम पंचायतीचे जुने दस्तऐवज, प्रशासकीय नोंदी, संगणकीय साहित्य व अन्य महत्त्वाचे रेकॉर्ड नष्ट झाल्याने ग्राम पंचायत प्रशासनासमोर आता रेकॉर्डची पुनर्बांधणी करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT