बेळगाव : सोन्याची भिशी सुरू करणार्या सराफाला नुकसान झाल्याने त्याने आपली आणि दोन्ही बहिणींसह विषारी द्रव प्राशन केल्यानंतर सराफ, त्याची आई आणि एक बहीण अशा तिघांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरी बहीण अत्यवस्थ आहे.जीवन संपवण्यापूर्वी सराफाने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये एका दाम्पत्याचा उल्लेख असून, शहापूर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सराफ संतोष गणपती कुर्डेकर (वय 47), त्याची बहीण सुवर्णा गणपती कुर्डेकर (52) आणि त्यांची आई मंगल गणपती कुर्डेकर (वय 85, तिघेही रा. जोशी मळा, खासबाग) अशी मृतांची नावे आहेत. सुनंदा गणपती कुर्डेकर (50) या दुसर्या बहिणीनेही विष प्राशन केले होते. परंतु, त्या आश्चर्यकारकरीत्या वाचल्या असून त्या अत्यवस्थ आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून फिर्याद लिहून घेतली आहे. त्यानुसार 500 ग्रॅम सोने घेतलेला सराफ राजेश कुडतरकर (रा. वडगाव) व त्याच्या पत्नीविरोधात शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी दरमहा ठराविक ग्रॅम सोने जमा करायची भिसी सराफी व्यावसायिक संतोष कुर्डेकर याने सुरू केली होती. जमा होणारे सोने प्रत्येक महिन्याला एका सदस्याला दिले जात होतेे. यातीलच अर्धा किलो सोने संतोषने राजेश कुडतरकर याच्याकडे ठेवायला दिले होते. महिन्याच्या 10 तारखेला फुटणार्या भिशीच्या वेळी राजेशने ते सोने संतोषला परत द्यायचे, असे ठरले होते. त्यानुसार संतोषने काही दिवसांपूर्वी राजेशकडे सोने परत मागितले.
परंतु, राजेश व त्याच्या पत्नीने अर्धा किलो सोन्याबाबत कानावर हात ठेवले. आम्ही तुझ्याकडून सोने घेतलेले नाही, त्यामुळे ते परत देण्याचा प्रश्नच येत नाही. उलट तूच आम्हाला आमच्या वाट्याच्या 200 ग्रॅम सोने द्यायला हवे, असे म्हणत मानसिक त्रास सुरू केला. तसेच आमचे सोने परत दिले नाही, तर तुला जगू देणार नाही, अशी धमकीही दिली.
ज्याच्याकडे सोने ठेवायला दिले होते तो परत देत नाही, शिवाय ज्यांनी भिशीद्वारे सोने गुंतवले होते ते सर्वजण संतोषला मानसिक त्रास देत होते. तू आमचे सोने दे अन्यथा जीव दे, अशा शब्दांत त्रास दिला जात होता. या सर्व त्रासाला सदर सराफ कंटाळला होता. यातूनच त्याने सर्वासोबत आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे जीवन संपवण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून स्पष्ट होते.
सातत्याने होणारा मानसिक त्रास आणि काहीच मार्ग दिसत नसल्याने संतोष अस्वस्थ होते. यातूनच त्यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास स्वतः, दोघी बहिणी व आईला विश्वासात घेतले. त्यानंतर सराफी कामासाठी वापरले जाणारे पोटॅश पाण्यात मिसळून सगळ्यांनी ते सकाळी नऊच्या सुमारास पिले. बारा वाजण्याच्या सुमारास यापैकी तिघांचा मृत्यू झाला, तर सुनंदा ही महिला उठून बसली होती. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
संतोष यांनी राजेश कुडतरकर याचा पत्ता व मोबाईल क्रमांकही चिठ्ठीत लिहिला आहे. शिवाय काही लोकांनी तर गुंडांना पाठवून मारतो, मार्केटमध्ये धिंड काढतो, अशी धमकी दिली. हे सर्व सहन झाल्याने आम्ही आत्महत्या करत आहोत, असाही उल्लेख चिठ्ठीत आहे.
जीवन संपवण्यापूर्वी संतोष कुर्डेकर यांनी सविस्तर चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भिशीमध्ये मोठा लॉस झाल्याने लोकांचे पेमेंट करू शकलो नाही. त्यामुळे मला टॉर्चर करण्यात येत होते. तरीही मी सर्वांचे पेमेट केले असते. मात्र तीन-चार किलो सोने घेऊन मी गाव सोडून गेलो, अशी अफवा पसरवली गेली. माझ्यासह आई व बहिणींना घराबाहेर पडणे मुश्कील झाले. या बदनामीमुळेच आम्ही चौघेही आत्महत्या करीत आहोत. माझ्या ग्राहकाचे सोने राजेश कुडतरकर याच्याकडे ठेवले आहे. ते सोने परत न करता उलट तो व त्याच्या बायकोने मला 200 ग्रॅम सोने दिल्याचा आरोप केला. त्यामुळे कृपया ते सोने त्याच्याकडून घेऊन पोलिसांनी ते सोने ज्याचे त्याला परत करावे.