Crime 
बेळगाव

Belgaum Crime : गर्लफ्रेंडला पुढे करत काढला सर्वेशचा काटा

दोन भावांसह चौघांना अटक : खुनाचे नियोजन दोन महिन्यांपासून, सोशल मीडियावरुन मुलीशी मैत्री

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मारुतीनगर, सांबरा रोड परिसरातील तरुण सर्वेश अभिजीत कंग्राळकर (वय २७) याच्या खून प्रकरणी माळमारुती पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सर्वेश सहजासहजी हाती सापडणार नाही हे माहिती असल्याने त्यांनी एका तरुणीला त्याची गर्लफ्रेंड बनायला लावून तिच्यामार्फत त्याला मंडोळी रोडवर बोलावले. तेथे मारुन त्याला खानापूर-जांबोटी मार्गावर फेकल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतजमिनीतील शेडचा वाद आणि गेल्यावर्षी यातील मुख्य संशयितावर सर्वेशने केलेला चाकूहल्ला या खुनामागील मुख्य कारण आहे.

शशी संजय जालगार (वय ३३), राहुल संजय जालगार (३०, दोघेही रा. कपिलेश्वर मंदिरामागे), दशरथ राज रजपूत (२३, रा. मारुती मंदिराच्या पाठीमागे कपिलेश्वर मंदिरजवळ) व अरुण लक्ष्मण हुल्लोळी (२२, रा. विनायकनगर, पिरनवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

सर्वेशच्या वडिलांनी २१ सप्टेंबर रोजी आपला मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. २० सप्टेंबर रोजी गणेश दर्शनासाठी गेलेला मुलगा परतला नसल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार पोलिसांकडून शोध सुरु होता. तीन दिवसांपूर्वी सर्वेशचा मृतदेह खानापूर-जांबोटी मार्गावरील मलप्रभा नदीपासून काही अंतरावर कोकणवाडा गावाजवळ निर्जनस्थळी सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत उपरोक्त चौघांना अटक केली.

खुनामागे खुनी हल्ल्याचा राग

खून झाला तो सर्वेश व आता अटक केलेला शशी जालगार हे आधी एकत्र फिरायचे. गतवर्षी हिरेबागेवाडी परिसरात पार्टीच्यावेळी चप्पल आगीत टाकल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून सर्वेशने शशीवर चाकूहल्ला केला होता. तेव्हापासून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. याच काळात या दोघांमध्ये कपिलेश्वर मंदिराच्या पाठीमागील शेतजमिनीत शेड घालण्यावरुनही वाद सुरु होता. या रागातून शशीने सर्वेशला संपवायचा कट रचला असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

ती गर्लफ्रेंड कोण?

शशी व सर्वेशमध्ये वाद सुरु झाला होता तेव्हापासून सर्वेश काळजी घेत होता. एकटा बाहेर न पडणे, कुठे जायचेच असेल तर सोबत काहीजणांना घेऊन जाणे सुरु होते. त्यामुळे तो एकटा सापडावा, यासाठी शशीकडून सापळा रचला जात होता. अटक केलेल्या संशयितांपैकी दशरथ याच्या ओळखीची एक तरुणी आहे. तिला सर्वेशला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायला लावत तिच्याशी मैत्री वाढवण्यास सांगितले. दोघांची मैत्री वाढत गेल्यानंतर ते दोघे एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर करुन बोलत होते.

२० सप्टेंबर रोजी सर्वेश घरातून बाहेर पडला तेव्हा या तरुणीनेच त्याला भेटायला बोलावले होते. हा सर्व कट शशी व त्याच्या मित्रांनी रचला होता. गर्लफ्रेंडने बोलावले आहे म्हणून सर्वेश मंडोळी रोडवरील वाटवे कॉलनी परिसरात गेला. तेथे त्याच्यावर हत्याराने वार करत खून करुन मृतदेह जांबोटीजवळ नेऊन फेकण्यात आला. पोलिस आयुक्त प्रकाश निकम, कायदा सुव्यवस्था शाखेचे डीसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, माळमारुतीचे पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT